बिबवेवाडी: सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यांत घेण्याचा निर्णय दिला आहे. यामुळे बिबवेवाडी, सहकारनगर परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करावे, अशी अपेक्षाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात कोरोना काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. गेल्या काळात महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आदींच्या निवडणुका सतत पुढे ढकलल्या गेल्यामुळे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी नाराजीचे वातावरण दिसून येत होते. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. (latest pune news)
गणेश शेरला म्हणाले की, गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी जीव ओतून काम केले आहे. भविष्यात आम्हाला ही जनतेची सेवा करण्याची संधी मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची आम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत होता.
संजय वाघमारे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत दिलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. आता निवडणूक आयोगाने पुढील चार महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अमोल परदेशी म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील चार महिने जीव ओतून या निवडणुकीसाठी तयार करणार आहे.
आरपीआयचे (खरात गट) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कांबळे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाने समाधान वाटत आहे. मात्र या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी आमची मागणी आहे.