पुणे

आकुर्डी : स्मार्ट सिटीत जॉगिंग ट्रॅकची पुरती ‘वाट’

अमृता चौगुले

[toggle title="भास्कर सोनवणे" state="open"][/toggle]

आकुर्डी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी- चिंचवड महापालिकेने शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी तब्बल तीन कोटी रुपये खर्चून आकुर्डी परिसरात इको जॉगिंग ट्रॅक साकारले आहेत; मात्र या ट्रॅकचा वापर नागरिकांकडून प्रात:र्विधीसाठी केला जात आहे; तसेच काही नागरिक आपले पाळीव श्वान फिरवण्यासाठी जॉगिंग ट्रॅकवर घेऊन येतात. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने बनविलेल्या या ट्रॅकचा दुरुपयोग होत असून, ट्रॅक तयार करण्यासाठी खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याचे दिसते.

आकुर्डी येथील जॉगिंग ट्रॅकच्या आजूबाजूला झाडे-झुडपे वाढल्याने ट्रॅक न राहता ती पाऊलवाट बनली आहे. तसेच या ठिकाणी व्यायामासाठी कमी आणि प्रात:र्विधीसाठीच याचा वापर केला जात आहे. परिणामी येथील पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे; तसेच काही नागरिक सकाळ आणि सायंकाळी तेथे श्वान घेऊन फिरण्यास येतात. हे श्वान याठिकाणी घाण करतात. त्यामुळे व्यायामासाठी येणार्‍या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

प्रकाशव्यवस्थेअभावी महिलांची पाठ

कोट्यवधी रुपये खर्चून इको जॉगिंग ट्रॅक मोठ्या दिमाखात बनविण्यात आले; मात्र सायंकाळी अंधार झाल्यानंतर प्रकाशव्यवस्था नसल्याने सुरक्षेच्या कारणास्तव व्यायामासाठी येथे महिला, नागरिक येण्याचे टाळतात. सगळीकडे घाण साठली आहे.

अंधाराचा फायदा घेताहेत प्रेमीयुगुल

या ट्रॅकवर प्रकाशव्यवस्था नसल्याने रात्री आठनंतर अंधाराचा फायदा घेऊन प्रेमीयुगुल येथे अश्लील चाळे करत बसतात. त्यांना नागरिकांनी हटकल्यास दादागिरीची भाषा करून त्यांच्या साथीदारांना बोलवून घेतले जाते. दमदाटी केली जाते, असे येथील नागरिकांनी सांगितले.

पोलिसांनीही रात्रीची गस्त घालावी.

सायंकाळी सातनंतर जॉगिंग ट्रॅकच्या आजूबाजूला प्रकाशव्यवस्था नसल्याने अश्लील चाळे करणारे तसेच मद्यपींचा वावर जास्त वाढल्याने पोलिसांनीही रात्रीची गस्त घालण्याची मागणी येथील नागरिकांनी
केली आहे.

दांडीबहाद्दरांचा ठिय्या

सकाळी सातनंतर परिसरातील शाळांमधील काही दांडीबहाद्दर विद्यार्थीही येथे येतात. तेथील कट्ट्यावर मोबाईलमध्ये ते मग्न असतात. त्यांना हटकले असता आॉफ पीरियड असल्याचे सांगतानाच ते वेळ मारून नेतात. तासन्तास त्यांनी येथे ठिय्या मांडल्याचे दिसून येते.

ट्रॅक परिसरात कचरा

संजय काळे ग्रेट सेपरेटरजवळ तसेच गंगानगर जवळील रेल्वेपूल परिसरातील जॉगिंग ट्रॅक परिसरात कचरा टाकल्याचे दिसून येते. त्यामुळे सगळीकडे घाण झाली आहे. येथे असलेल्या वस्तीमधील नागरिकांतून राडारोडा, खराब भाजीपाला टाकण्यात येतो.

मद्यपींचा वावर

रोज रात्री जॉगिंग ट्रॅकच्या आतमध्ये, कट्ट्यावर मद्यपींचा वावर वाढला आहे; तसेच काही मद्यपी रिक्क्षात येऊन तेथेच कडेला मद्याचे सेवन करून बाटल्या टाकून देतात. काहीजण तर ट्रॅकवरच लघुशंका करत असल्याचे येथील नागरिक सांगतात. त्यामुळे परिसर अस्वच्छ झाला आहे.

दुसर्‍या टप्प्यात जॉगिंग ट्रॅकच्या आजूबाजूला प्रकाशव्यवस्थेचे काम विद्युत विभागाकडून करण्यात येणार आहे. ट्रॅकच्या दोन्ही बाजूला सौर ऊर्जा किंवा दिव्यांचे खांब लावण्याची व्यवस्था करण्यात येईल.

– अब्दुल हमीद मोमीन,
कनिष्ठ अभियंता स्थापत्य विभाग

रात्री प्रकाशव्यवस्थेअभावी तुरळक व्यायामप्रेमी येत असल्याने आम्ही जॉगिंग ट्रॅकवर जाण्याचे टाळतो. जवळच्याच महापालिकेच्या उद्यानामध्ये आम्ही जॉगिंग व व्यायाम करण्यास प्राधान्य देतो.

– अनिल गायकवाड, अमोल नवले, विजय जगताप, प्राधिकरण, आकुर्डी

हेही वाचा

SCROLL FOR NEXT