पुणे: शहरातील नामांकित कॉलेजमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने एक महिलेची 21 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबात आत्तापर्यंत बंडगार्डन पोलिसांकडे आठ ते दहा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. (Latest Pune News)
याप्रकरणी, चिंचवडगाव येथील 46 वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसानी महोम्मद वसीर आलम खान (वय 40, रा. परमार बिल्डिंग साधु वासवानी चौक पुणे स्टेशन जवळ) याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मे ते सप्टेंबर 2025 दरम्यानच्या कालावधीत घडला आहे.
याबाबत पोलिस उपनिरीक्षक धिरज गुप्ता यांनी सांगितले, फिर्यादी महिला आणि आरोपी खान या दोघांचा परिचय फोनद्वारे झाला होता. खान याची कन्सल्टन्सी असून, तो शहरातील विविध नामांकित कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याचे काम करतो. खान याने फिर्यादी महिलेच्या मुलाला नामांकित कॉलेजमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळून देतो, असे सांगितले.
त्यासाठी त्याने वेळोवेळी फिर्यादी महिलेकडून रोख आणि ऑनलाईन स्वरुपात 21 लाख रुपये घेतले. खान याने अशाच प्रकारे इतर आठ ते दहा जणांना फसविल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. जर कोणाची खान याने कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक केली असेल तर त्यांनी बंडगार्डन पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन गुप्ता यांनी केले आहे.