पुणे

Ganeshotsav 2023 : पुण्यातील पेठांमध्ये पौराणिक, जिवंत देखाव्यांवर भर; दुसर्‍या दिवसापासूनच भक्तांसाठी खुले

अमृता चौगुले

पुणे : कसबा पेठेतील चर्चेत असलेल्या गणेश मंडळांनी यंदाही पौराणिक तसेच नावीन्यपूर्ण जिवंत देखावे करण्यावर भर दिला आहे. जनार्दन पवळे संघाने नाशिक येथील काळाराम मंदिराची साकारलेली प्रतिकृती. फणी आळी तालीम मंडळाने कल्याणची लूट जिवंत देखावा, त्वष्टा कासार समाज संस्थेची कार्ला येथील श्री एकविरा मंदिर प्रतिकृती, इत्यादी देखावे गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेणार हे निश्चित.

मानाचा पहिला श्री कसबा गणपती

कसबा पेठेतील मानाचा पहिला गणपती म्हणून ओळख असलेल्या कसबा गणपतीला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. गणेशोत्सवाला हजेरी लावण्यासाठी अनेक सेलिबि—टी, राजकीय पुढारी येथे येतात. मंडळाने यंदा 'श्री क्षेत्र मोरगावचे वैभवद्वार यात्रा'ची प्रतिकृती साकारलेली असून, मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे आहेत.

फणी आळी तालीम मंडळ

कसबा गणपतीपासून हाकेच्या अंतरावरील फणी आळी तालीम मंडळाने शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत देखाव्यांच्या माध्यमातून सादर करण्याची परंपरा जपली आहे. मंडळाने यंदा 10 कलाकारांसह 'कल्याणची लूट' हा ऐतिहासिक जिवंत देखावा सादर केला आहे. मंडळाचे हे 77 वर्ष आहे. ओंकार काळे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

जनार्दन पवळे संघ मित्र मंडळ

प्रसिद्ध कला दिग्दर्शक सिद्धार्थ तातुस्कर व त्याचे 10 कलाकार यांनी दोन महिने अथक परिश्रम घेऊन जनार्दन पवळे संघ मित्र मंडळाचा देखावा नाशिक येथील ऐतिहासिक काळाराम मंदिराची 14 बाय 20 फूट व 30 फूट उंचीची भव्य आकारातील प्रतिकृती साकारली आहे. हे मंदिर भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. देखाव्याचे उद्घाटन पुनीत बालन यांच्या हस्ते झाले. मंडळाचे उत्सवप्रमुख राकेश डाखवे आहेत.

त्वष्टा कासार मंडळ

पवळे चौक येथील त्वष्टा कासार समाज मंडळाने यंदा श्री एकविरा देवी मंदिर व लेणीची भव्य प्रतिकृती सादर केली आहे. देवीचे भव्य मंदिर व लेणी यामध्ये साकारलेली आहेत. मंडळाने आपली परंपरा नेहमीसारखली जपली आहे. या मंडळाचे अध्यक्ष अविनाश वडके असून, यंदा या मंडळाचेे हे 130 वे वर्ष आहे.

प्रकाश मित्र मंडळ

सरदार मुजुमदार बोळ येथील प्रकाश मित्र मंडळाने यंदा 'शिवराय छत्रपती जाहले' हा जिवंत देखावा साकारला आहे. यामध्ये 6 कलाकारांनी भाग घेतला आहे. महेश अमराळे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

ऑस्कर मित्र मंडळ

कसबा गणपती परिसरातील ऑस्कर मित्र मंडळाचे यंदाचे 38 वे वर्ष आहे. 'लालमहालातील शिवतांडव' हा जिवंत देखावा, 10 कलाकारांसह सादर करणार आहे. या देखाव्यांचे दिग्दर्शन प्रज्ञा दंडवते यांनी केले आहे. मंडळाचे अध्यक्ष सौरभ घोगरे आहेत.

अजिंठा मित्र मंडळ

पवळे चौकाजवळील अजिंठा मित्र मंडळाने नेहमीप्रमाणे सजीव देखाव्यावर भर दिला आहे. मंडळाने यंदा शिवराज्याभिषेक सोहळा संजीव देखावा करण्याची परंपरा जपली आहे. 22 कलाकारांसह हा जिवंत देखावा साकारला आहे. विजय देशमुख (मरळ) मंडळाचे अध्यक्ष असून, मंडळाचे हे 68 वर्ष आहे.

नवग्रह मित्र मंडळ

कसबा गणपतीच्या जवळ असणारे नवग्रह मित्र मंडळांनी अमृतसर येथील सुवर्णमंदिराची 40 फूट प्रतिकृती साकारली आहे. मानसिंग पाटोळे मंडळाचे अध्यक्ष असून, मंडळाचे हे 74 वे वर्ष आहे.

श्रीकृष्ण मित्र मंडळाकडून स्त्रीशक्तीचा जागर

पवळे चौकातील श्रीकृष्ण मित्र मंडळाचे यंदाच्या वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. स्त्रीशक्तीचा जागर झाला पाहिजे यासाठी तुळजाभवानीमातेचे 28 फुटी भव्य मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. जागर करण्यासाठी सफाई कामगार, नर्स, बचत गटांच्या भगिनी यांचा सन्मान करण्याचे योजिले असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अनिकेत मालेगावकर यांनी सांगितले.

आवर्जून पाहावे असे…

फणी आळी तालीम मित्र मंडळ ः 'कल्याणची लूट' जिवंत देखावा.
जनार्दन पवळे संघ ः नाशिक येथील ऐतिहासिक काळाराम मंदिराची भव्य प्रतिकृती.
त्वष्टा कासार समाज मित्र मंडळ ः श्री एकविरा देवी मंदिर व लेणीची प्रतिकृती
श्रीकृष्ण मित्र मंडळ ः तुळजाभवानीमातेचे मंदिर प्रतिकृती.
ऑस्कर मित्र मंडळ ः 'लालमहालातील शिवतांडव' जिवंत देखावा.
अजिंठा मित्र मंडळ ः 'शिवराज्याभिषेक सोहळा' जिवंत देखावा.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT