पुणे : महावितरणच्या पुणे परिमंडलात मागील काही दिवसांपासून टी.ओ.डी. वीजमीटर बसविण्याचे काम सुरू केले आहे. आत्तापर्यंत सुमारे साडेचार लाख वीजमीटर बसले असून, ते कार्यान्वित देखील झाले आहेत. मात्र, या नवीन वीजमीटरमुळे वीजबिले मात्र दुप्पट आली आहेत. त्यामुळे वीजग्राहक चांगलेच वैतागले आहेत. परिणामी, जुनेच मीटर बरे होते, असे म्हणायची वेळ ग्राहकांवर आली आहे.
राज्य शासनाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून राज्यात महावितरणमध्ये नवीन प्रकारचे टी.ओ.डी. वीजमीटर (टाईम ऑफ डे) बसविण्याचे आदेश काढले होते. निविदा काढून काही मोठ्या कंपनींना कोट्यवधी रुपयांचे ठेके देण्यात आले आहेत. त्यानुसार आता महावितरणच्या पुणे परिमंडलात पुणे शहरासह विविध भागांत जुने मीटर काढून नवीन टी.ओ.डी. वीजमीटर बसविण्याचे काम सुरू झाले आहे. आत्तापर्यंत शहराच्या विविध भागांत सुमारे साडेचार लाख वीजमीटर बसविण्यात आले आहेत. मात्र, हे नवीन वीजमीटर बसविण्यामुळे वीजग्राहकांची डोकेदुखीच वाढल्याचे दिसून आले आहे. जुन्या वीजमीटरचे बिल काही नागरिकांना (घरगुती वीजग्राहक) किमान वीजबिल 700 ते दोन हजार किंवा जास्तीत जास्त तीन हजार रुपयांपर्यंत येत होते. आता त्याच नागरिकांना हेच बिल सात हजार, 10 हजार, 15 हजार रुपयांपर्यंत आले आहे. त्यामुळे वीजग्राहक चांगलेच संतप्त झाले आहेत.
शहरातील केशवनगर, फुरसुंगी, भेकराईनगर, सहकारनगर, पर्वती या भागांत महावितरणच्या वतीने घरगुती सिंगल फेजचे नवीन टीओडी स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. पण, या स्मार्ट वीजमीटरमुळे वीजबिल मात्र भरमसाट येत असल्याच्या या भागातील ग्राहकांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. मध्यमवर्गीय काम करणाऱ्या आणि पंधरा ते वीस हजार रुपये वेतन असलेल्या काही ग्राहकांना वीजबिल मात्र 10 हजार रुपये आले आहे. तर दुसऱ्या एका ग्राहकाला 12 ते 15 हजार रुपये वीजबिल आले आहे. या वाढून आलेल्या वीजबिलामुळे ग्राहक मात्र चांगलेच धास्तावले आहेत. एवढे वीजबिल कसे भरायचे? असा प्रश्न त्यांना पडला आहे.
याबाबत संबंधित काही ग्राहकांनी वाढीव आलेल्या वीजबिलाबाबत महावितरणच्या अधिकाऱ्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. महावितरण कंपनीने या स्मार्ट मीटरची तपासणी करून नागरिकांना योग्य वीजबिले द्यावीत, अशी मागणी केली आहे.