Ajit Pawar on Local Bodies Election
पुणे: राज्यासह जिल्ह्यातील आमदारांची संख्या वाढविण्यासाठी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेतील ताकद महत्त्वाची ठरते. त्यामुळे महापालिका निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला कसे सामोरे जायचे, याचा निर्णय राज्य पातळीवर होईल.
महायुती म्हणून निवडणूक लढवायचा निर्णय झाला तरी, त्याबाबतचे सर्वाधिकार त्या त्या जिल्ह्यांना आणि शहरांना दिले जातील. काँग्रेसबरोबर आघाडीत असतानाही तसा निर्णय वेळोवेळी घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी येथे शुक्रवारी सांगितले. (Latest Pune News)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत वर्धापनदिनाचे नियोजन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष सुभाष जगताप, सुनील टिंगरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा, महिला प्रांताध्यक्ष रूपाली चाकणकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, रूपाली ठोंबरे, हाजी फिरोज शेख, अक्रूर कुदळे यांच्यासह अन्य आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात अनेक प्रवेश होतील. मात्र त्यावरून कार्यकर्त्यांनी कोणतेही राजकारण करू नये. पक्षाला मोठे करण्यासाठी पक्ष प्रवेश आवश्यक आहेत. मात्र कोणी कोणाला थांबवू शकत नाही. निवडून येण्याची क्षमता हाच निवडणुकीत उमेदवारीचा निकष असेल. त्यासाठी सर्वेक्षण केले जाईल. हीच पद्धत अवलंबून शिरूरचे आमदार माऊली कटके आणि भोरचे आमदार शंकर मांडेकर यांना संधी देण्यात आली. महापालिका निवडणुकीतही याच पद्धतीने सर्वेक्षण केले जाईल.
विचारधारेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही!
पक्षप्रवेश होत राहतील. मात्र, त्याचा विचार न करता काम करत रहा. महापालिका निवडणुकीपूर्वी सर्वेक्षण करूनच उमेदवार निश्चित केला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेपासून काही अपवाद वगळता कायमच सत्तेमध्ये राहिली आहे. राज्यात महायुतीचे सरकार आहे. मात्र यातील तिन्ही पक्षांच्या विचारधारा भिन्न आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा शाहू-फुले-आंबेडकर यांना मानणारी आहे. त्यात कोणताही तडजोड केली जाणार नसल्याचे पवार यांनी सांगितले.
प्रत्येक वॉर्डात आपला कार्यकर्ता असला पाहिजे
कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांची ताकद वर्धापनदिनावेळी दिसली पाहिजे. बालेवाडी येथे होणार्या या कार्यक्रमासाठी कोण किती कार्यकर्ते आणतो आणि ताकद दाखवितो, यावर लक्ष ठेवले जाईल. त्यातून महापालिका निवडणुकीचा विचार होईल. निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने कामाला लागतात. बेरजेचे राजकारण करा. प्रत्येक वॉर्डात कार्यकर्ता दिसला पाहिजे. जनसंपर्क कायम ठेवताना चुकीच्या विधानांमुळे त्रास होणार नाही, याची दक्षता घ्या, अशी सूचनाही अजित पवार यांनी यावेळी केली.
दोन मतदारसंघांची अदलाबदल होणार
गेल्या आठवड्यात सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप यांच्याकडे शहराध्यक्षपदाची विभागून जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसर आणि वडगावशेरी या मतदारसंघाची जबाबदारी टिंगरे यांच्याकडे तर पर्वती, खडकवासला, कोथरूड आणि शिवाजीनगर मतदारसंघाची जबाबदारी जगताप यांच्याकडे सोपविण्यात आली होती.
मात्र यातील टिंगरे यांच्याकडील पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ जगतापांकडे तर जगताप यांच्याकडील शिवाजीनगर मतदारसंघ टिंगरे यांच्याकडे देण्यात येणार आहेत. त्याबाबतचे लेखी पत्र काढण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगतानाच विधानसभानिहाय कार्यकारिणी तातडीने करण्याची सूचना केली.