पुणे: कल्याणीनगर येथील पोर्श कार अपघात झाल्यानंतर ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने देण्यासाठी आलेल्या अल्पवयीन कारचालकासह त्याच्या मित्रांच्या रक्ताचे नमुने बदल करताना ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे हा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर व वॉर्डबॉय अतुल घटकांबळेच्या संपर्कात होता.
त्यामुळे रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याच्या कटात डॉ. अजय तावरेचा सक्रिय सहभाग सिद्ध करणारे पुरेसे पुरावे आहेत, अशी माहिती सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी गुरुवारी सत्र न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांच्या न्यायालयाला दिली. (Latest Pune News)
या प्रकरणात निर्दोषमुक्त करावे यासाठी डॉ. तावरे याने अर्ज केला आहे. त्याला विरोध करताना विशेष सरकारी वकील शिशिर हिरे म्हणाले, घटनेच्या दिवशी तो रजेवर असल्याचा दावा तावरे याने केला आहे. परंतु, त्याचे कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले असता, तो डॉ. हाळनोर व अतुल घटकांबळेच्या संपर्कात असल्याचे दिसत आहे.
पालकांच्या सांगण्यावरून अल्पवयीन मुलांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी त्याने दबाव टाकला. या प्रकरणातील साक्षीदारांनी कबुलीजबाब नोंदविला असून, त्याद्वारे तावरे याची या कटात महत्त्वाची भूमिका निदर्शनास येते, असा युक्तिवाद हिरे यांनी केला. या अर्जावर 10 जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
रक्ताचे नमुने बदलण्यासाठी विशाल व शिवानी अगरवाल, अरुणकुमार सिंग यांनी अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद, आशिष मित्तल यांच्याशी संगनमत करून शिपाई अतुल घटकांबळेमार्फत ससूनच्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि न्यायवैद्यकचा तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे यांना लाच दिल्याचे निष्पन्न झाले.