पुणे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लटकलेल्याच

अमृता चौगुले

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राज्यात सत्तांतर होऊनही जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा तसेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे सध्या प्रशासकांवरच पालिका, जिल्हा व पंचायत समित्यांचा कारभार अवलंबून आहे. कार्यकाल पूर्ण होऊन जवळपास दीड वर्षाचा कालखंड उलटला आहे. मात्र, नगरपालिका निवडणुकांची अद्यापही प्रतीक्षा कायम आहे. एकीकडे ग्रामपंचायती, बाजार समित्या व सहकारी संस्था यांच्या निवडणुकीचा रणसंग्राम होत असतानाच नगरपालिकांच्या निवडणुकीला मुहूर्त लागेनासा झाला आहे. प्रशासंकावर ताण वाढल्याने विकासकामांना खीळ बसली आहे. त्यामुळे मतदारही आता निवडणुका लवकर घेण्याची मागणी करू लागला आहे.

मागासवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाचा तिढा निर्माण झाल्याने निवडणुकांना विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. बारामती नगरपालिकेवरही प्रशासक काम करीत आहेत. प्रशासकावर कामाचा ताण येत आहे. दीड वर्षाचा कार्यकाळ होऊनही निवडणुकांबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याने जुन्याच पदाधिकार्‍यांना कामाची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. राज्यात नुकतेच सत्तांतर झाले. त्यानंतर राष्ट्रवादीचा एक गटही सत्तेत सहभागी झाला. यानंतर निवडणुका होतील अशी अपेक्षा असतानाच न्यायालयीन बाब असल्याचे कारण देत निवडणुका वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत. निवडणुकांसाठी तारीख पे तारीख सुरू असल्याने पदाधिकार्‍यांची मात्र कोंडी झाली आहे. निवडणुकीची तयारी वाया गेल्याने अनेक इच्छुक उमेदवार निराश झाले आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT