मंचर: नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची सर्वत्र उत्सुकता असून इच्छुक उमेदवारांचे डोळे त्या घोषणेवर खिळले आहेत. निवडणुकीच्या हालचालींना सुरुवात झाल्याने अनेक ठिकाणी इच्छुकांनी मतदारांशी संपर्क वाढवण्यास प्रारंभकेला आहे. (Latest Pune News)
धार्मिक यात्रा, दिवाळी भेटवस्तू आणि सामाजिक जेवणावळींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु निवडणुकीची तारीख जाहीर न झाल्याने उमेदवारांचा खर्च वाढत चालला असून अनेक जण आर्थिक अडचणीत सापडले आहेत. केवळ तारीख जाहीर झाली असती तर आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने प्रचाराचा खर्च नियंत्रित करू शकलो असतो, अशी इच्छुक उमेदवारांची भावना व्यक्त होत आहे. निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर होण्याची प्रतीक्षा आता सर्व पातळ्यांवर वाढली असून गावोगाव चर्चा रंगत आहेत.
गेल्या महिन्यापासून उमेदवारांचा भेटीगाठी, यात्रांमध्ये सहभाग, जेवणावळी यावर मोठा खर्च होतोय. तारीख जाहीर झाली असती तर नियोजन करता आले असते. आता खर्चाचा ताण वाढल्याने उमेदवारांची दमछाक होत आहे.धोंडिभाऊ भोर, पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष