पुणे : अतिवृष्टीचे संकट इतके मोठे आहे की जितकी मदत केली तरी ती कमी आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेणे अपरिहार्य आहे. सरकार या बाबतीत गंभीर असून शेतकऱ्यांचे दुःख दूर करणे, त्यांना उभे करणे व त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे ही प्राथमिकता आहे. कर्जमाफीचा निर्णय सरकार नक्कीच घेईल असा विश्वास उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे यांनी पुणे शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नवरात्रोत्सव येथे शुक्रवारी उशिरा भेट दिली. त्यानंतर ते माध्यमाशी बोलत होते. शिंदे म्हणाले, पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या संकटात आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार नियम व अटी बाजूला ठेवून पुढे जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली योजना राज्य सरकारनेदेखील अमलात आणली आहे. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे ते म्हणाले. बाळासाहेब बाळासाहेबच राहणार, हिंदुहृदयसम्राट राहणार. जर नावांमध्ये तांत्रिक चूक झाली असेल तर ती दुरुस्त केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिले.
नवरात्रोत्सवाचे महत्त्व
शिंदे यांनी नवरात्रोत्सवाच्या महत्त्वावर बोलताना सांगितले, “महाराष्ट्रात नवरात्र मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. पुण्यातही गरबा व दांडिया उत्साहात साजरे होत आहेत. आपल्या संस्कृतीचे जतन करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्र सणांचा माहेरघर आहे.”