आळंदी : कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्तीसाठी शासनाकडून एक कोटी रुपये तत्काळ मंजूर करण्यात आले. आळंदीतील कार्यक्रमात रविवारी (दि. 26) विविध विकासकामांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आळंदीतील रस्त्यांची अवस्था आळंदी देवस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे यांनी आणून दिली होती.(Latest Pune News)
कार्तिकी यात्रेपूर्वी हे रस्ते दुरुस्त होणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी नमूद केले होते. त्या नंतर तत्काळ रस्त्याच्या कामासाठी एक कोटी मंजूर करतो. पालिकेने काम करून घ्यावे आणि काम झाल्यानंतर तत्काळ मला त्याचे फोटो पाठवावे अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानंतर लगेचच अवघ्या 24 तासांत त्यांनी आपले आश्वासन पूर्ण करत आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांकडे एक कोटी रुपये मंजूर केल्याचा शासन निर्णयच देऊ केला.
त्यांच्या या कार्यतत्परतेबद्दल आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.