पुणे: ‘रेल्वे सुरक्षा बलाने शुक्रवारी (दि. 19) एकाच दिवशी घर सोडून पुणे रेल्वे स्थानकावर आलेल्या आठ अल्पवयीन मुलांना पकडले. त्यांची चौकशी करून त्यांना साथी संस्थेत ठेवण्यात आले आहे. चाइल्ड वेल्फेअर कमिटीच्या सुचनेनंतर त्यांना लवकरच त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले जाणार आहे,’ अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे पुणे स्थानकावरील निरीक्षक सुनील यादव यांनी दिली.
आरपीएफ पुणे यांच्याकडून शुक्रवारी ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत शुक्रवारी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी, चाइल्ड हेल्प लाईन (सीएचएल) पुणे आणि एनजीओ यांच्या संयुक्त मोहिमेदरम्यान, आरपीएफ पुणे, पुणे रेल्वे स्टेशनवर घालण्यात आलेल्या गस्तीद्वारे ही 8 अल्पवयीन मुले पालक किंवा नातेवाईकांच्या उपस्थितीशिवाय प्लॅटफॉर्म क्रमांक 01, 02 आणि 04 वर एकटेच भटकताना आढळली. (Latest Pune News)
त्यांच्याकडे सहानुभूतीपूर्ण केलेल्या चौकशीनंतर मुलांनी उघड केले की, ते त्यांच्या कुटुंबीयांना न कळवता घराबाहेर पडले होते. काही मित्रांच्या प्रेरणेने पुणे येथे आले होते, तर काही वैयक्तिक कारणांमुळे निघून आले होते. त्यांचे लहान वय आणि असुरक्षितता लक्षात घेऊन सर्व मुलांना तत्काळ आरपीएफकडून ताब्यात घेण्यात आले.
वैद्यकीय तपासणी आणि समुपदेशनानंतर, मुलांना बालकल्याण समिती (-1), येरवडा, पुणे येथे हजर करण्यात आले. त्यांच्या निर्देशांनुसार, 07 मुलांना साथी ओपन शेल्टर होममध्ये आणि एका मुलाला श्री साई सेवा ओपन शेल्टर होममध्ये त्यांचे पालक येईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सोपविण्यात आले आहे.
स्थानकावर शनिवारीही 6 मुले आढळली...
आरपीएफ पुणे यांच्याकडून शनिवारीही ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. शनिवारीही आरपीएफला पुणे रेल्वे स्थानकावर 06 मुले एकटीच फिरताना आढळून आली आहेत. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना सामाजिक संस्थांकडे सोपविण्यात आले आहे. त्यांचे पालक आल्यावर त्यांच्याकडे या अल्पवयीन मुलांना सुपूर्द केले जाईल, असे आरपीएफ निरीक्षक सुनील यादव यांनी दै.‘पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.