voter verification Pudhari
पुणे

EF form voter verification: मतदार अर्ज भरण्याची उद्याची अंतिम मुदत

मतदारांनी ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत तो संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे अनिवार्यपणे जमा करावा, असे आवाहन आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार राहुल सारंग यांनी केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

मंचर: निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेला विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ अंतिम टप्प्यात आला असून, अद्याप पडताळणी अर्ज (ईएफ फॉर्म) न भरलेल्या मतदारांनी ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत तो संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे अनिवार्यपणे जमा करावा, असे आवाहन आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार राहुल सारंग यांनी केले आहे.

या विशेष पुनरीक्षण मोहिमेद्वारे २००२ च्या मतदार यादीशी पडताळणी, दुबार नावे, मृत तसेच स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे आणि मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराने पडताळणी अर्ज भरून तो वेळेत सादर करणे आवश्यक आहे.

प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की, अनेक मतदारांनी अद्याप अर्ज सादर केलेला नाही. ८ ऑगस्टनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा या विशेष मोहिमेत विचार केला जाणार नसल्याने निवडणुकीच्या वेळी मतदार यादीत नाव नसणे किंवा माहितीमध्ये त्रुटी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता तातडीने अर्ज भरून संबंधित बीएलओंकडे जमा करावेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अधिक माहितीसाठी नागरिकांनी तहसील कार्यालयाच्या निवडणूक शाखेशी संपर्क साधावा किंवा मतदार सहाय्यक भ्रमणध्वनी अनुप्रयोगाचा वापर करावा, असे आवाहन नायब तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी केले.

मतदार यादीतील अचूक नाव ही लोकशाहीतील सहभागाची पहिली अट आहे. ज्या नागरिकांनी अद्याप ईएफ फॉर्म भरलेला नाही, त्यांनी ८ ऑगस्टपूर्वी तो बीएलओकडे जमा करून आपली राष्ट्रीय जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT