E Hakk System 7/12 Online Pudhari
पुणे

Maharashtra E Hakk System 7/12 Online: ई-हक्क प्रणाली सुरू; सातबारा नोंदींसाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज संपणार

वारस नोंद, बोजा बदल यांसह ११ प्रकारच्या सेवा आता ऑनलाइन उपलब्ध; नागरिकांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सातबारा उतार्‍यावर वारस नोंद, बोजा चढवणे किंवा कमी करणे यांसारख्या वेगवेगळ्या 11 प्रकारच्या कामांसाठी आता नागरिकांना तलाठी कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही. भूमिअभिलेख विभागाने तयार केलेल्या 'ई-हक्क' या ऑनलाइन प्रणालीद्वारे नागरिक आता घरबसल्या अर्ज करू शकणार आहेत.

फेरफार नोंदविण्यासाठी नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अथवा तलाठी कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज दाखल करावा लागतो. तलाठी त्या नोंदीचा फेरफार धरून तो मान्यतेसाठी मंडल अधिकार्‍यांकडे ऑनलाइन पाठवतात. मात्र, काही तलाठ्यांकडून फेरफार नोंदविला जात नाही, तर काही मंडल अधिकार्‍यांकडून जाणीवपूर्वक संबंधित फेरफार मंजुरीस विलंब होतो. वाद अथवा हरकत नसेल, तर नियमाने एक महिन्याच्या आत या दोन्ही नोंदी करणे, हे नियमानुसार आहेच.

परंतु, काही तलाठी व मंडल अधिकार्‍यांकडून अडथळा निर्माण केला जात असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने ई-हक्क प्रणालीचा १०० टक्के वापर करण्याचे आदेश महसूल अधिकार्‍यांना दिले आहे. जिल्हा आदेशानुसार कागदपत्रे अपूर्ण असली, तरी तलाठ्यांना अर्ज प्रशासनाच्या कागदपत्रे अपूर्ण असली तरी तलाठ्यांना अर्ज थेट नामंजूर करता येणार नाही. तलाठ्यांनी 7/12 वर नोंद घेऊन, अपूर्ण कागदपत्रांबाबत अर्जदाराला लेखी कळवून पुढील निर्णयासाठी प्रकरण मंडळ अधिकार्‍यांकडे पाठवावे. ई-हक्क प्रणालीवरील अर्ज जास्त काळ प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे आदेश आहेत.

प्रणालीचा वापर बंधनकारक

अनोंदणीकृत फेरफार नोंदीसाठी ई-हक्क प्रणालीचा वापर करणे बंधनकारक केले आहे. जर एखादा खातेदार लेखी अर्ज घेऊन आला, तर त्याला ई-हक्क प्रणालीद्वारेच अर्ज करण्यास सांगितले जाईल. ऑनलाइन अर्जास सक्षम नसलेल्यांना मदत करण्यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कर्मचार्‍याची नेमणूक करण्यात येईल.

या सुविधा ऑनलाइन

वारस नोंद, मयताचे नाव कमी करणे, बोजा चढविणे, गहाणखत नोंदवणे, बोजा कमी करणे, ई-करार नोंद, अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे, एकत्र कुटुंब मॅनेजर नोंद कमी करणे, विश्वस्ताचे नाव बदलणे, हस्तलिखित व संगणकीकृत 7/12 मधील तफावत/चूक दुरुस्त करणे, मयत कुळाची वारस.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT