भामा आसखेड: स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी अजूनही खेड तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या भोरगिरी गावातील वेळवळी वस्ती पाण्यासाठी तळमळते आहे.
आजच्या आधुनिक युगात जिथे ‘हर घर जल’ ही जलजीवन योजनेची घोषणा केंद्र व राज्य शासनाकडून दिली जाते, तिथे या वस्तीतील महिलांना डोंगर-दर्यांतून ओढ्यातील पाणी पिण्यासाठी आणताना अक्षरशः एक किलोमीटरची जीवघेणी पायपीट करावी लागते. वेळवळी वस्तीतील महिलांच्या डोक्यावरील हंडा कधी उतरणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. (Latest Pune News)
जंगलातला संघर्ष
भोरगिरी हे गाव जंगल परिसरात वसलेले असून, वेळवळी वस्तीतील लोक अजूनही मूलभूत पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. वस्तीपर्यंत रस्ता, वीज व्यवस्था आली असली तरीही पिण्याच्या पाण्यासाठी हक्काची योजना अद्याप अस्तित्वातच नाही.
दररोज जंगलातून पाणी आणताना रानडुक्कर, बिबटे व वाघसदृश हिंसक वन्यप्राण्यांचा धोका टाळून महिलांना ही कसरत करावी लागत आहे. पाण्याच्या हंड्याचा भार महिलाच्या फक्त डोक्यावर नसून, तो त्यांच्या आयुष्याची व्यथा बनली असून येथील महिलांच्या डोक्यावरील हंडा कधी उतरणार, हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.
प्रशासन कुठे अडकलं?
‘हर घर जल’, ‘जल जीवन मिशन’, तसेच राज्य सरकारच्या ‘शुद्ध पाणी सर्वांसाठी’ अशा अनेक योजनांचा लाभ ग्रामीण भागातील अनेक गावांनी घेतला, पण भोरगिरीच्या वेळवळी वस्तीला या योजनेतून डावलले गेले आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय. वेळवळीच्या दोन्ही वस्त्या गावच्या पश्चिमेला उंचावर असून आता कुठेतरी त्यांच्यासाठी रस्ता व लाईटची व्यवस्था झाली.
रस्ता नव्हता तेव्हा येथील वृद्ध व आजारी माणसाला डोलीतून आणावे, न्यावे लागत होते. पायाभूत व मूलभूत सुविधांपासून वस्ती वंचित राहिली आहे. स्थानिक भोरगिरी ग्रामपंचायतीचे प्रशासन वस्तीसाठी काही करतंय की नाही हाही प्रश्न निर्माण होतो.
‘पाणी भरायला सकाळी लवकर उठावं लागतं. दिवसभर शेतातील मजुरीच्या कामावरून घरी आल्यावर आलेल्या बायका परत रात्री पाणी आणायला जातात. जरा उशीर झाला की त्यांचे प्राण संकटात सापडण्याची भीती असते. सगळी कामं आटोपून पाण्यासाठी एवढा वेळ घालवावा लागतो. आजारी असताना देखील महिलांना पाणी आणावं लागतं.- शंकर भगवान बाणेरे, स्थानिक नागरिक