दीपेश सुराणा
पिंपरी(पुणे) : शहरातील विविध सोसायट्यांना जाणवणार्या पाणी टंचाईमुळे टँकर लॉबीचे चांगलेच फावते आहे. महापालिकेकडून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यातच सोसायट्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने त्यांना वापराच्या पाण्यासाठी टँकर मागवावे लागतात. सोसायट्यांना त्यासाठी दिवसाला कमीत कमी दोन तर काही सोसायट्यांना चक्क 20 टँकर इतके पाणी मागवावे लागते. त्यामुळे सोसायटीधारकांना महिन्याला लाखो रुपयांचा भुर्दंड बसत आहे.
शहरामध्ये सध्या महापालिकेकडूऩ पवना धरणातून दररोज 510 दशलक्ष लिटर, आंद्रा धरणातून 50 दशलक्ष लिटर तर, एमआयडीसीकडून 30 दशलक्ष लिटर इतके पाणी पुरवठा केला जातो. शहरासाठी पाण्याचा कोटा वाढला असतानाही अद्याप सोसायट्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यांना वापरासाठी पाणी अपुरे पडत असल्याने नाईलाजास्तव टँकर मागवावे लागतात. छोट्या सोसायट्यांना दिवसाला कमीत-कमी 2 ते 10 टँकर पाणी लागते. तर, मोठ्या सोसायट्यांना दिवसाला चक्क 20 टँकर इतके पाणी लागते.
एका सोसायटीला दिवसाला सरासरी 10 टँकर इतके पाणी लागत असेल आणि सध्या एका टँकरसाठी असलेला 1 हजार रुपये इतका सरासरी दर पकडला तर 10 हजार रुपये दिवसाला खर्च येत आहे. तर, महिन्याला सुमारे 3 लाख रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे सोसायटीतील रहिवासी त्रस्त झाले आहेत. काही भागामध्ये प्रति टँकरमागे 1 हजार तर, काही ठिकाणी प्रति टँकरसाठी 1 हजार 200 रुपये इतकी रक्कम द्यावी लागत आहे.
शहरात काही सोसायट्यांमध्ये जानेवारीपासून तर काही सोसायट्यांमध्ये मार्चपासून टँकर सुरु झाले आहेत. जून अखेरपर्यंत सोसायट्यांतील पाण्याचे टँकर कमी होत असतात. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने अद्याप टँकर सुरुच आहेत. पवना धरणात 17.90 टक्के पाणी पवना धरणामध्ये शनिवार अखेर (दि. 24) 17.90 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभरात 12 मिलिमिटर पाऊस झाला. दरम्यान, सोसायट्यांतील बहुतांश बोअरवेल सध्या आटल्या आहेत. त्यामुळे सोसायटीधारकांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.
काळेवाडी, रावेत, थेरगाव, वाकड, पुनावळे, पिंपळे सौदागर, मोशी, पाटीलनगर, बगवस्ती, डूडूळगाव, चर्होली आदी परिसरातील सोसायट्यांमध्ये सध्या वापरासाठी पाणी कमी पडते आहे.
सोसायट्यांना जास्त पाणी वापरण्याची सवय लागली आहे. महापालिकेकडून प्रति व्यक्ती 90 लिटर इतके पाणी दररोज दिले जाते. महापालिकेकडून सध्या करण्यात येणारा पाणीपुरवठा पुरेसा आहे. सोसायट्यांनी पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुर्नवापर करायला हवा. पवना धरणातील सध्याचा पाणीसाठा लक्षात घेता शहरासाठी जुलै अखेरपर्यंत पाणी पुरणार आहे.
– श्रीकांत सवणे, सह-शहर अभियंता, महापालिका.
काळेवाडी, थेरगाव, वाकड, रावेत, पुनावळे, पिंपळे सौदागर आदी भागांतील सोसायट्यांना सध्या दिवसाला 2 ते 20 टँकर इतके पाणी लागत आहे. महापालिकेने प्रति व्यक्ती 130 लिटर इतके पाणी पुरवायला हवे. सध्या बोअरवेलचे पाणी आटले आहे. त्यामुळे सोसायटीधारकांना टँकरशिवाय पर्याय राहिलेला नाही.
– दत्ता देशमुख, अध्यक्ष,
पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन.मोशी, डूडूळगाव, चर्होली आदी भागांतील सोसायट्यांना सध्या दिवसाला 5 ते 10 टँकर इतके पाणी मागवावे लागत आहे. सोसायट्यांतील रहिवाशांना आवश्यक पाणी पुरविण्याबाबत विकसकांनी हमीपत्र लिहून दिले आहे. मात्र, त्यानुसार सोसायट्यांना पाणी पुरविले जात नाही. त्या हमीपत्रानुसार विकसकांनी सोसायट्यांतील रहिवाशांना पाणी उपलब्ध करुन द्यावे, असे आदेश आयुक्तांनी द्यावे.
– संजीवन सांगळे, अध्यक्ष,
हेही वाचा