खोर : दरवर्षी उन्हाळ्यात तीव— पाणीटंचाईला सामोरे जाणार्या खोर (ता. दौंड) गावात यंदा मे महिन्यातच जलसमृद्धीचे दृश्य दिसत आहे. अवकाळी पावसामुळे गावातील पद्मवती, फरतडे वस्ती आणि डोंबेवाडी पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून, ओढेही खळखळून वाहू लागले आहेत. परिणामी, गावात अनेक वर्षांपासून भेडसावत असलेली टंचाई संपुष्टात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून खोर गावात दर उन्हाळ्यात तीव— पाणीटंचाई जाणवत होती. मार्च महिन्याच्या शेवटपासूनच गावातील विहिरी, कूपनलिकांसह इतर पाण्याचे स्त्रोत आटत होते. शेती पाण्याअभावी रखरखीत पडत होती. अनेकदा जिल्हा प्रशासनाकडून टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा करावा लागत होता. पण यावर्षी या सर्व अडचणींना सुरुवातीलाच पूर्णविराम मिळाल्याने गावकर्यांच्या चेहर्यावर समाधानाची झलक स्पष्ट दिसत आहे.
या वर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच अवकाळी पावसाने खोर गावात जोरदार हजेरी लावली. अवघ्या चार ते पाच दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे गावाच्या परिसरातील सर्वच जलसाठे भरून वाहू लागले आहेत. गावातील पद्मवती तलाव, फरतडेवस्ती तलाव, आणि डोंबेवाडी पाझर तलाव हे सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरले गेले असून त्यांच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. हे दृश्य पाहून ग्रामस्थ भारावून गेले आहेत. गावाच्या विविध भागांमध्ये पुन्हा हिरवळ पसरू लागली आहे. शेतीसाठी आवश्यक असलेला ओलावाही निर्माण झाला आहे. शेतकरी आता पेरणीपूर्व मशागतीस सज्ज झाले असून यंदा चांगल्या उत्पादनाची आशा व्यक्त करत आहेत.
माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले की, “गेल्या काही वर्षांत जलसंधारणाच्या विविध उपाययोजना राबवल्या. बंधारे, शेततळी, तलावांचे खोलीकरण यामुळे यंदा कमी पावसातही भरपूर पाणी साठले. खोरची ही यशोगाथा केवळ पावसाची नसून जलसंधारण, योग्य नियोजन आणि सामुदायिक प्रयत्नांची आहे. हे मॉडेल इतर टंचाईग्रस्त गावांसाठीही प्रेरणादायी ठरू शकते.