पुणे: शहर आणि परिसरात अवकाळी पावसामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. दरम्यान, अचानक जोरदार पाऊस पडल्याने झाडांच्या फांद्या तुटणे, तसेच, भूमिगत वाहिन्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे वीज पुरवठा खंडित होत असल्याची माहिती महावितरण वीज कंपनीच्या पुणे परिमंडलातील अधिकाऱ्यांनी दिली.
पुणे शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून विविध भागात अधूनमधून अवकाळी पाऊस पडत आहे. दरम्यान, या अवकाळी पावसाचा जोर जास्त आहे. त्यातही वादळीवारे वाहण्याचे प्रमाणही जास्त आहे. (Latest Pune News)
त्यामुळे या पावसात झाडांच्या फांद्या तुटणे, झाडे उन्मळून वीज वाहिन्यांवर पडणे, असे प्रकार वारंवार होत आहेत. तसेच, शहरातील अनेक भागात भूमिगत वीज वाहिन्या आहेत. या भूमिगत वीज वाहिन्यांमध्ये पावसाचे पाणी गेल्यामुळे बाष्प तयार होत आहे. या बाष्पामुळे वीज वाहिन्या थंड पडून त्यामधून वीज प्रवाह बंद होत आहे. त्यामुळे देखील वीज पुरवठा खंडित आहे.
वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे संबंधित भागात चार चार तास वीज पुरवठा सुरळीत होत नाही. परिणामी, नागरिक चांगलेच वैतागत आहेत. याबाबत महावितरणच्या पुणे परिमंडलातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मान्सूनपूर्व महावितरणची कामे सुरू आहेत. मात्र, पुण्यात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित होत आहे.