पिंपरी(पुणे) : शहरातील नागरिकांना महापालिकेचे रुग्णालय व दवाखान्यात सर्वात्तम वैद्यकीय सेवा आणि सुविधा मिळावी, या उद्देशाने सोशल इम्पॅक्ट बॉण्डद्वारे (एसआयबी) सुमारे 100 कोटींची गुंतवणूक उपलब्ध केली जात आहे. त्यातून रुग्णालय व दवाखान्यांत आणखी सुधारणा केल्या जाणार आहेत. त्यामुळे रुग्णांना अधिक चांगली सेवा मिळेल. येत्या दोन ते तीन महिन्यांत त्याची सुरुवात करण्याचे नियोजन वैद्यकीय विभागाने केले आहे.
महापालिकेच्या सन 2021-22 या अर्थसंकल्पात तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी वैद्यकीय सेवेसाठी सोशल इम्पॅक्ट बॉण्डची संकल्पना मांडली. अर्थसंकल्प 18 फेबु्रवारी 2021 ला सादर झाल्याच्या सहा महिन्यांनी त्याबाबतच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. सोशल इन्पॅक्ट बॉण्ड ही नावीन्यपूर्ण वित्तपुरवठा पद्धत आहे. या प्रकल्पासाठी निवडले गेलेले गुंतवणूकदार आरोग्य सेवा केंद्र सुधारण्यासाठी गुंतवणूक करतात. गुंतवणुकीची परतफेड महापालिकेने निश्चित केलेले उद्दीष्टे साध्य झाल्यानंतर केली जाते.
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (युएनडीपी) ही बहुस्तरीय विकास करणारी संस्था आहे. आरोग्य केंद्राचे सक्षमीकरण हे त्याचे महत्वाचे कार्यक्षेत्र आहे. युएनडीपी महापालिकेला आरोग्य केंद्रांच्या सुधारासाठी लागणार्या योजना व अंमलबजावणीसाठी तांत्रिक सहाय करते. तसेच, अनुदान देऊ करते. प्रकल्प अंतर्गत मूल्यमापन करणे, योजना आखणे, जोखीम घेऊ शकणारे गुंतवणूकदार शोधण्यास मदत करणे, महापालिकेसाठी प्रकल्प अंमलबजावणी करणे, त्यासाठीच्या निविदा प्रक्रियेसाठी पॅलेडियम कन्सल्टींग इंडिया प्रा. लि.ची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. तीन वर्षांत सुमारे 100 कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित आहे. सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
या संदर्भातील कामकाजासाठी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त (क्रमांक 1), मुख्य लेखा व वित्त अधिकारी, वैद्यकीय विभागप्रमुख व वायसीएमचे अधिष्ठाता या 5 अधिकार्यांची समिती स्थापन केली आहे. गुंतवणूकदार नेमणे, आरोग्य केंद्र व रुग्णालये सुधारण्यासाठी उद्दिष्टे निश्चित करणे, अटी व शर्ती ठरविणे, गुंतवणुकीसाठी मदत करणार्या एजन्सीसोबत त्रिपक्षीय करार करणे, आवश्यकता भासल्यास प्रकल्पासाठी एस्क्रो खाते उघडणे आदी कामे समिती करीत आहे.
सोशल इम्पॅक्ट बॉण्डच्या अंमलबजावणीसाठी मुंबईतील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्स या संस्थेची नेमणूक केली आहे. सोशल इन्पॅक्ट बॉण्डच्या अंमलबजावणीपूर्वी महापालिकेचे रुग्णालय व दवाखान्यांतील वैद्यकीय उपचार सुविधा व सोईचे सद्यस्थिती जाणून घेतली जाणार आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर वैद्यकीय सेवा व सुविधेत झालेले बदल्याचे मूल्यमापन केले जाणार आहे. त्यासाठी ही संस्था काम करणार आहे. संस्थेला 16 जून 2023 ला आयुक्तांनी मान्यता दिली आहे.
नॅशनल अॅक्ररिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अॅण्ड हेल्थकेअरच्या (एनएबीएच) मान्यतेने सर्व 41 आरोग्य केंद्रात सुधारणा केली जाणार आहे. उपचार क्षमतेत वाढ झाल्याने रुग्णांना अधिक चांगली सेवा मिळेल. महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत महापालिकेला सध्या मिळणार्या 80 टक्के भरपाईचे प्रमाण 100 टक्के होईल.
रुग्णालयास लागणारे साहित्य, प्रयोगशाळा, इतर यंत्रसामुग्री वाढल्याने वायसीएम रुग्णालयावरील रुग्णांचा ताण कमी होईल. वायसीएम रुग्णालयातील उपचार क्षमता वाढविली जाणार आहे. दोन नवीन शस्त्रक्रिया विभाग सुरू केले जाणार आहेत. हाडांचा व इतर शस्त्रक्रियांची सुविधा वाढल्याने प्रतीक्षा कालावधी कमी होईल, असा दावा महापालिकेच्या अधिकार्यांनी केला आहे.
महापालिकेचे रुग्णालय व दवाखान्यांत सध्या कोणत्या सोयी व सुविधा आहेत. मनुष्यबळ पुरेसे आहे का, तेथील सेवेबाबत रुग्ण समाधानी आहेत का? आदीबाबत सविस्तर सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेने एका एजन्सीची नियुक्ती केली आहे. ती एजन्सी सर्वेक्षण करून महापालिकेस देणार आहे. त्यानंतर येत्या दोन ते तीन महिन्यांत सोशल इंम्पक्ट बॉण्डची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली जाईल, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.
हेही वाचा