शंकर कवडे
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग कार्यालयातील स्वागत कक्षात टाकण्यात आलेल्या साहित्यांमुळे कक्षाला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. विविध कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना माहिती देण्यासाठी उभारलेल्या कक्षात स्वागत करणार्या व्यक्तीऐवजी भंगार साहित्य तसेच कचरा पडलेला दिसून येतो. एकीकडे स्वागत कक्षाची कचराकुंडी झालेली असताना दुसरीकडे कर्मचारीही व्यवस्थित माहिती देत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
शिवाजीनगर येथील जुना तोफखाना परिसरातील कै. भाऊसाहेब शिरोळे भवनात पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाचे कार्यालय आहे. या ठिकाणी इमारतीच्या तळमजल्यावर स्वागत कक्ष आहे. मात्र, प्रत्यक्षात हा कक्ष भंगार साहित्यांमुळे अडगळीची खोली बनला आहे. शिक्षण विभागात विविध कामकाजासाठी आल्यानंतर सर्व माहिती या कक्षाद्वारे दिली जाते. यामध्ये कामकाजानुसार कोणत्या अधिकार्यांना भेटता येईल, माहिती अधिकार अर्ज जमा करणे तसेच माहिती उपलब्ध होणे आदी सर्व गोष्टींची माहिती या कक्षातील जनसंपर्क अधिकार्याद्वारे दिली जाते. मात्र, अधिकारीच नसल्याने कक्ष शोभेपुरताच उरला आहे.
कक्षाच्या दर्शनी भागाचे विद्रूपीकरणही करण्याकडे प्रशासनाने पुरेपूर लक्ष दिल्याचे दिसून येते. विभागाकडून देण्यात येणारी माहिती फलकाऐवजी कक्षाच्या दर्शनी भागावर चिकटवली आहे. त्यामुळे सुंदर कक्षाच्या विद्रूपीकरणात आणखी भर पडल्याचे दिसते. दर्शनी भागात स्वागत कक्षामार्फत काय काम पार पाडले जाते, या माहितीचा फलक आहे. प्रत्यक्षात कक्षाची झालेली कचराकुंडी तसेच अन्य कर्मचारीही दाद देत नसल्याने माहिती विचारायची कोणाला? हा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
नागरिकांना सूचना देण्याऐवजी प्रशासनाने कार्यालय नागरिकांच्या दृष्टीने कसे सोईस्कर होईल, याचा विचार करणे आवश्यक आहे. पालिकेच्या महत्त्वाच्या विभागात कक्षाची ही अवस्था व्हावी, हे दुर्दैवी आहे. प्रशासनाने तत्काळ कक्षातील
सर्व सामान हलवून त्या ठिकाणी पूर्णवेळ जनसंपर्क अधिकार्याची नेमणूक करावी.– राहुल शिरोळे, नागरिक
हेही वाचा