भोर: रुंदीकरणासाठी खोदलेल्या भोर-महाड रस्त्यावर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य होऊन अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. पावसाळ्यात भोर-महाड रस्त्यावरून प्रवाशांना ये-जा करतानाची वाट बिकट होऊ लागली आहे. जोराचा पाऊस सुरू झाल्यावर या मार्गावरील असणार्या गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भोर-महाड रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून संथगतीने सुरू आहे. परिणामी, याही वर्षी नागरिकांना पावसाळ्यात प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. या मार्गावर उन्हाळ्याच्या दिवसांत वारवंड ते हिर्डोशीपर्यंत मोठ्या प्रमाणात धुरळा उडत होता. (Latest Pune News)
ठेकेदाराने तो फुफाटा बाजूला न केल्यामुळे आठ-दहा दिवसांपासून वाहनचालकांना चिखलातून वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. दोन दिवसांपासून सतत रिमझिम पावसामुळे रस्ता चिखलमय झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही ठेकेदार व प्रशासन उपाययोजना करीत नसल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
मांघेरीच्या ओढ्यावरील पुलाचे काम संथगतीने
तसेच मांघेरीच्या ओढ्यावरील पुलाचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे पावसाळ्यात ओढ्यातून ये-जा करण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ज्या ठिकाणी खोदकाम केले त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे प्रवाशांना गुडघ्याभर पाण्यात गाडीतून रस्त्याचा मार्ग शोधावा लागत आहे.
जोराचा पाऊस झाला आणि परिस्थिती अशीच राहिली, तर हा रस्ता बंद होऊन पुढील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी मातीचा रस्ता आहे, तेथे खडी टाकून रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी या मार्गावरील ग्रामस्थांनी केली.
पावसाच्या पाण्याने रस्त्याचा भराव वाहून गेला
रात्रभर पावसामुळे डोंगरदर्यांतून पाणीपातळी वाढल्यामुळे कोंढरी येथे नवीन रुंदीकरण केलेल्या रस्त्याचा भराव पाण्याबरोबर वाहून गेला. त्यामुळे रस्ता खचला आहे. याच हिर्डोशी हद्दीत सकाळी मोठा ट्रक अडकल्याने इतर वाहनांना जा-ये करताना मोठी अडचण होत होती, तसेच ज्या ठिकाणी मोर्यांसाठी व रस्त्यासाठी खोदकाम केले तेथे वाहनांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिकांना तर याचा रोजच त्रास सहन करावा लागत आहे, तरीही प्रशासनाकडून यावर कोणतीही कार्यवाही केलेली दिसत नाही.
हिर्डोशी हद्दीत वीस दुचाकीस्वार घसरून पडले
हिर्डोशी हद्दीतील सोमजाईचा पूल ते प्राथमिक आरोग्य केंद्र या अर्धा किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यावर पूर्ण चिखल साचला आहे. यातून वाहने जाऊन राडा झाला आहे. त्यामुळे वाहने घसरत असून, शुक्रवारी (दि. 23) दिवसभरात 15 ते 20 दुचाकीस्वार घसरून पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.