Dry Fruits Price Hike Pudhari
पुणे

Pune Dry Fruits Price Hike: सुका मेवा महागला! बदाम-पिस्त्याची आवक निम्म्यावर; १५ दिवसांत दर १०० ते ३०० रुपयांनी वाढले

श्रावण-सणासुदीच्या मागणीचा परिणाम; वाहतूक खर्च चौपट झाल्याने पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डात दरवाढीचा तडाखा

पुढारी वृत्तसेवा

शंकर कवडे

पुणे: ऑस्ट्रेलियासह अमेरिकेतील बदाम आणि पिस्ता उत्पादनात झालेली घट, स्थानिक बाजारपेठेत टप्प्याटप्प्याने निघणारे सौदे आणि वाढलेला वाहतूक खर्च, यामुळे गुलटेकडी मार्केट यार्डात होणारी सुका मेव्याची आवक निम्म्यावर आली आहे. दुसरीकडे, श्रावणासह आगामी सणासुदीमुळे मागणी वाढली आहे. परिणामी, अवघ्या पंधरा दिवसांत बदाम, पिस्ता आणि काजूच्या दरात किलोमागे १०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे.

देशातील सुका मेव्याच्या बाजारपेठेत बदाम आणि पिस्त्याची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. मात्र, उत्पादक देशांतील उत्पादन घटल्याने स्थानिक बाजारपेठांमधून मालाचे सौदे टप्प्याटप्प्याने होत आहेत. परिणामी, भारतात येणाऱ्या मालाचे प्रमाण कमी झाले असून, त्याचे पडसाद पुण्याच्या बाजारपेठेतही उमटले आहेत. त्यातच होर्मुझमार्गे होणाऱ्या वाहतुकीतील अडथळ्यांमुळे सुका मेव्याची वाहतूक लांबच्या पर्यायी मार्गाने करावी लागत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे वाहतूक खर्च जवळपास चौपट झाला असून, किलोमागील खर्चात ७० ते ८० रुपयांची भर पडत आहे. आवक कमी आणि वाहतूक खर्च जास्त, अशी दुहेरी परिस्थिती निर्माण झाल्याने सुका मेव्याचे भाव वाढत आहेत. पुण्याच्या बाजारपेठेत एरवी दर आठवड्याला १० ते २० टन बदामाची आवक होते. सध्या ती केवळ पाच ते दहा टनांवर आली आहे. त्याचप्रमाणे पिस्त्याची आठवड्याची आवक ४०० ते ५०० किलोवरून २५० किलोपर्यंत घसरली असल्याचे व्यापारीवर्गाकडून सांगण्यात आले.

पुण्याच्या बाजारातील सुका मेव्याचे भाव (प्रतिकिलो)

  • बदाम ७५० ते १,००० रुपये ८५० ते १,२०० रुपये

  • पिस्ता २,४०० ते २,८०० रुपये २,७०० ते ३,००० रुपये

  • काजू ८०० ते १,३०० रुपये ९०० ते १,४०० रुपये

बदाम-पिस्ता महागल्याने मिठाईवाल्यांचा काजूकडे मोर्चा

पुण्याच्या बाजारात देशांतर्गत उत्पादनाबरोबरच दक्षिण आफ्रिका, टांझानिया आणि श्रीलंकेतूनही काजू विक्रीसाठी येतो. यंदा देशात काजूचे उत्पादन चांगले झाल्याने बाजारातील आवक वाढली आहे. एरवी आठवड्याला ३० टन असणारी आवक सध्या ४० टनांपर्यंत पोहचली आहे. मात्र, बदाम आणि पिस्त्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने मिठाई उत्पादकांनी काजूच्या खरेदीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आवक वाढूनही मागणीचा जोर कायम असल्याने काजूच्या दरातही किलोमागे १०० रुपयांची वाढ झाल्याचे सुका मेव्याचे व्यापारी नवीन गोयल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT