पुणे

Pune News : खेकडे पकडण्याचा नाद अंगलट! दारूच्या नशेत पुलाच्या नळ्यात अडकला, गावकऱ्यांच्या सतर्कतेने मृत्यूच्या दाढेतून सुटका

नदीपात्रात पडून पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन पुलाच्या नळ्यामध्ये अडकले. त्यांच्या शरीराचा अर्धा भाग नळ्यात अडकला होता, तर अर्धा भाग बाहेर होता.

पुढारी वृत्तसेवा

कडूस : खेकडे पकडायला गेले होते, पण ते नशेत होते. पावसाळ्याचा हंगाम सुरू झालेला... आणि म्हणतात ना, 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती!' धामणमाळचे रघुनाथ काळे यांचं नशीब मंगळवारी (दि. २४) अक्षरशः पाण्यात न्हालं, पण गावकऱ्यांच्या तत्परतेने पुन्हा काठावर आलं, ते देखील थेट पुलाच्या नळ्यामधून!

याबाबतची माहिती अशी की, रघुनाथ काळे (वय ५०, रा. धामणमाळ, कडूस) हे कडूस येथील स्मशानभूमीजवळील कुमंडला नदीच्या पुलाजवळ खेकडे पकडण्यासाठी गेले होते. यावेळी ते नशेत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. पावसामुळे ओलसर झालेल्या कठड्यावरून त्यांचा तोल गेला. ते थेट नदीपात्रात पडून पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन पुलाच्या नळ्यामध्ये अडकले. त्यांच्या शरीराचा अर्धा भाग नळ्यात अडकला होता, तर अर्धा भाग बाहेर होता. नळ्यामध्ये आधीच मोठ्या प्रमाणात राडारोडा आणि गाळ साचलेला असल्याने पाण्याचा प्रवाह थांबलेला होता. परिणामी, काळे यांना बाहेर काढणे अधिक कठीण बनले. मात्र गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत दोरीच्या सहाय्याने त्यांना पकडून ठेवले.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तातडीने जेसीबी मागविण्यात आला. पुलाच्या नळ्यातील अडकलेला राडारोडा हटवून पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. यानंतर काळे यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

गावकऱ्यांची धावपळ, बघ्यांची गर्दी

या घटनेची माहिती गावात पसरताच बघ्यांनी पुलावर व नदीच्या दोन्ही काठावर गर्दी केली होती. संपूर्ण बचाव मोहिमेत गावकऱ्यांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद ठरली.

पूल धोकादायक स्थितीत

कुमंडला नदीवरील हा पूल अतिशय जुनाट असून त्याची उंची कमी आहे. नळ्यांमध्ये गाळ व राडारोडा साचल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. छोटा पाऊस झाला तरी पाणी पुलावरून वाहते. त्यामुळे या पुलाचे नूतनीकरण करावे, उंची वाढवून नव्याने बांधकाम करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT