पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये ड्रगचे वितरण करण्यासाठी आवश्यक असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सुनील बर्मन याने भाडेतत्त्वावर घर घेतले होते. त्यासाठी त्याला मदत करणार प्रॉपर्टी एजंट आणि बर्मनची समोरासमोर चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती गुरुवारी (दि.29) पोलिसांनी न्यायालयाला दिली. ड्रग निर्मिती आणि विक्री प्रकरणात पुणे पोलिसांनी बुधवारी (दि. 28) सुनीलचंद्र बिरेंद्र बर्मन (वय 35, रा. कुचबिहार, पश्चिम बंगाल) याला अटक केली आहे. बर्मन आणि यापूर्वी अटकेत असलेले कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अर्थकेम लॅबोरेटीज कंपनीचे मालक भीमाजी ऊर्फ अनिल परशुराम साबळे (वय 45) आणि अभियंता युवराज बब्रुवान भुजबळ (वय 40) यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले होते.
बर्मन याचा दिल्लीतील आरोपी संदीप कुमार, दिवेश मुथानी, संदीप यादव, देवेंद्र यादव व पुण्यातील आरोपी हैदर शेख व पप्पू कुरेशी यांच्याशी संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीच्या मदतीने पाहिजे आरोपी यांचा शोध घ्यायचा आहे. आरोपींनी अमली पदार्थातून मिळालेले पैसे कोणत्या कारणासाठी वापरले त्याबाबात त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन तपास करायचा आहे त्यासाठी भुजबळ व साबळे यांची पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकील पल्लवी काशीद यांनी केली. न्यायालयाने साबळे आणि भुजबळ यांना 4 मार्च, तर बर्मन याला नऊ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करून आत्तापर्यंत दिल्ली, सांगली आणि पुणे येथे छापा टाकून तीन हजार 600 कोटी रुपयांचे एक हजार 837 किलोग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले आहेत. या गुन्ह्यात आत्तापर्यंत एकूण 11 आरोपींना अटक झाली आहे.
साबळे आणि भुजबळ हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. त्यांनी महाराष्ट्रासह देशात इतर किती ठिकाणी व किती व्यक्तींना ड्रग तयार करण्यासाठी लागणारा फॉर्म्युला विकला आहे. तसेच फॉर्म्युल्यातून किती ठिकाणी अशाप्रकारे ड्रग विक्रीचे कारखाने उभे राहिले आहेत, याचा तपास करायचा आहे. मात्र, आरोपी तपासास सहकार्य करीत नसल्याचे गुन्ह्याचे तपास अधिकारी अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी न्यायालयास सांगितले.
आर्थिकबाबींच्या तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीची आवश्यकता नाही. गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आवश्यक असलेले कागदपत्रे पोलिसांकडे जमा करण्यात आलेले आहेत. तसेच पोलिसांनी ज्या कारणांसाठी पोलिस कोठडीची मागणी केली तीच कारणे मागील रिमांडमध्येदेखील होती, असे अॅड. पुष्कर दुर्गे यांनी युक्तिवादादरम्यान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. अॅड. दुर्गे यांना अॅड. आदित्य कुरुंजाळे, अॅड. रोहित जोशी, अॅड. राकेश उत्तेकर यांनी सहकार्य केले.
हेही वाचा