पुणे

उत्तर पुणे जिल्ह्यावर दुष्काळाची टांगती तलवार ! बळीराजाचे डोळे अद्यापही आकाशाकडेच

अमृता चौगुले

ओतूर : पुढारी वृत्तसेवा :  या वर्षी पावसाळ्याचे तीन महिने उलटले, तरी अद्याप उत्तर पुणे जिल्ह्यातील पिंपळगाव जोगा, डिंगोरे, ओतूर, खामुंडी, पिंपरी पेंढार, आळे, राजुरी, बेल्हे, अणे या महत्त्वाच्या गावांमध्ये पावसाचा थांगपत्ताच नाही. त्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. दिवसेंदिवस येथील शेतकरी राजा व्याकुळ होऊन दमदार पावसाची वाट पाहत आहे. मात्र, यंदा पाऊसच नसल्याने शेतकर्‍यांना भीषण दुष्काळाची चाहूल लागली आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला अत्यंत नगण्य पडलेल्या रिमझिम पावसावर पेरलेले सोयाबीन पीक उतरून आले होते. ते आता पावसाअभावी कोमेजून गेले आहे. कोमेजलेल्या सोयाबीन पिकाची वाढ पूर्णपणे खुंटली असून, शेंगांचाही कुठे मागमूस लागत नाही. या भागातील ओढे, नाले, तलाव, बंधारे अद्यापही कोरडे ठाकच आहेत. विहिरींनीही तळ गाठला असून, जेमतेम पाणी विहिरीत दिसून येते. अणे, माळशेज पट्ट्यातील सर्वच गावांवर दुष्काळाची गडद छाया पसरली आहे. यंदा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार असल्याचे भाकीत वर्तविले जात आहे.

प्यायलाच पाणी नसेल, तर शेतीला व जनावरांना पाणी आणायचे कोठून ? असा सवाल लोक विचारू लागले आहेत. जनावरांच्या चार्‍याचीदेखील समस्या भेडसावू लागली आहे. ढगांनी झाकाळलेले वातावरण रोगांच्या प्रादुर्भावाला खतपाणी घालत आहे. जीवापाड जपलेल्या शेतमालाला फवारण्या करून दमछाक झाली आहे. त्यात कोणत्याही शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्याने ग्रामीण अर्थकारण पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

सर्व ओढे, नाले कोरडेठाक
दरम्यान, खामुंडीचा सादाडा परिसरातील थोरला ओढा, ओतूरचा बदगीचा ओढा, डुंबरवाडीचा तलाव कोरडाठाक पडला आहे. दरवर्षी बिनचूक ओतूरच्या मांडवी नदीला येणारा पूर यंदा आलाच नाही. ही परिस्थिती गेल्या 25 वर्षांत एकदाही निर्माण झाली नव्हती असे येथील बुजुर्ग शेतकरी सांगत आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT