पारगाव : आंबेगाव तालुक्यात ऊस पिकावर औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर होत आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. विशेषतः शेतात बिबट्यांचा वावर वाढल्याने प्रत्यक्ष फवारणी करताना जीवितास धोका निर्माण होतो. अशा परिस्थितीत ड्रोनद्वारे फवारणी हा सुरक्षित, जलद आणि परिणामकारक पर्याय ठरत आहे.
ड्रोनच्या मदतीने कमी वेळेत मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात औषध फवारणी होते. मजुरीचा खर्च कमी होतो. औषधांची बचत होते. तसेच शेतकऱ्यांचा थेट संपर्क औषधांशी येत नसल्याने आरोग्याचाही धोका टाळला जातो. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावे ही बिबटप्रवण क्षेत्रात येतात. बिबट्यांच्या भीतीमुळे रात्री किंवा सकाळी लवकर शेतात जाणे टाळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ड्रोन फवारणी विशेष दिलासादायक ठरत आहे, असे शेतकरी संकेत बोंबे, आकाश खांडगे यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी ड्रोन फवारणीचा अवलंब केला असून उसाच्या पिकावर कीड व रोग नियंत्रण अधिक प्रभावी झाल्याचे नागापूर येथील ऊस उत्पादक शेतकरी पंकेश गायकवाड यांनी सांगितले.