Dr Sharad Gore World Record Pudhari
पुणे

Dr Sharad Gore: मराठी साहित्याचा जागतिक सन्मान; डॉ. शरद गोरे यांच्या नावावर 'वर्ल्ड रेकॉर्ड'

Dr Sharad Gore World Record: अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांच्या साहित्यिक कार्याची अमेरिकेच्या 'वर्ल्ड बुक'मध्ये जागतिक विक्रम म्हणून नोंद झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Dr Sharad Gore World Record: अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय साहित्यसेवेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. अमेरिकेतील 'वर्ल्ड बुक' या संस्थेने त्यांच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्याची जागतिक विक्रम (World Record) म्हणून नोंद केली आहे. गेल्या ३३ वर्षांपासून मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या डॉ. गोरे यांच्या या यशामुळे मराठी साहित्यविश्वात आनंदाचे वातावरण आहे.

लोकसहभागातून तब्बल १९६ साहित्य संमेलनांचे आयोजन

डॉ. शरद गोरे यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून आजवर १९६ मराठी साहित्य संमेलने यशस्वीपणे आयोजित केली आहेत. विशेष म्हणजे, ही सर्व संमेलने कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय लोकवर्गणीतून पार पडली आहेत. साहित्यविश्वात एवढ्या मोठ्या प्रमाणावर संमेलनांचे आयोजन करणारे ते एकमेव साहित्यिक मानले जातात.

या संमेलनांमध्ये ग्रामीण, युवा, नवोदित, पर्यावरण, शिक्षक साहित्य संमेलनांसह महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नारायण सुर्वे, जनकवी पी. सावळाराम आणि राजकुमार काळभोर यांच्या नावाने आयोजित प्रबोधनपर साहित्य संमेलनांचाही समावेश आहे. याशिवाय त्यांनी 'मॉरिशस आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलन' आयोजित करून मराठी भाषेचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावरही फडकवला.

लेखन, वक्तृत्व आणि प्रकाशन क्षेत्रातही मोठे योगदान

मूळचे सोलापूर जिल्ह्यातील उपळाई बुद्रूक गावचे आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले डॉ. गोरे हे केवळ साहित्य संमेलनांचे आयोजक नाहीत, तर ते एक प्रभावी वक्ते, लेखक आणि प्रकाशकही आहेत. आजवर त्यांनी विविध सामाजिक, ऐतिहासिक आणि साहित्यिक विषयांवर २ हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या लेखणीतून १० ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. विशेष म्हणजे, छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृतमध्ये लिहिलेल्या 'बुधभूषण' या ग्रंथाचा त्यांनी केलेला मराठी काव्यानुवाद वाचकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.

१५५ पुस्तकांचे प्रकाशन; नवोदितांना दिले व्यासपीठ

डॉ. गोरे यांच्या 'युगंधर प्रकाशन' संस्थेने आजवर १५५ दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. या माध्यमातून अनेक नवोदित आणि होतकरू लेखकांना आपले साहित्य प्रकाशित करण्याची संधी मिळाली आहे.

चित्रपट क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी

साहित्याबरोबरच चित्रपट क्षेत्रातही डॉ. गोरे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि संगीतकार अशा विविध भूमिकांमधून त्यांनी पाच मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांच्या 'एक प्रेरणादायी प्रवास – सूर्या' या चित्रपटाला कान्स आणि बर्लिन यांसारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरव मिळाला आहे.

मराठी साहित्यविश्वासाठी अभिमानाचा क्षण

मराठी भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी तीन दशकांहून अधिक काळ सातत्याने कार्य करणाऱ्या डॉ. शरद गोरे यांच्या साहित्यसेवेची जागतिक स्तरावर झालेली ही नोंद मराठी साहित्यविश्वासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यांच्या या यशाबद्दल साहित्यिक, लेखक, वाचक आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT