पुणे : काळाच्या ओघात अनेक संशोधने, तंत्रज्ञान यामुळे आरोग्य व्यवस्था प्रगत झाली, मात्र ती अद्याप गोरगरिबांपर्यंत पूर्णपणे पोहचलेली नाही. डॉक्टर व रुग्णांमधील संवाद तुटल्याचे चित्र आपल्याला दिसते. हा संवाद पुन्हा साधण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रतिपादन पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी केले.(Latest Pune News)
रुग्ण हक्क परिषद, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष (मुंबई), अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बालगंधर्व परिवार ट्रस्ट, पुणे महानगरपालिका, महाराष्ट्र साहित्य परिषद, ग््राँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे उद्घाटन रविवारी झाले. या वेळी डॉ. ओक बोलत होते. डॉ. स्मिता व डॉ. रवींद्र कोल्हे यांना पहिला ’महाराष्ट्र आरोग्यभूषण पुरस्कार 2025’ प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी चंद्रशेखर दैठणकर, पोलिस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील, स्वागताध्यक्ष व रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक उमेश चव्हाण, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह सुनिताराजे पवार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे मेघराज राजेभोसले,
डॉ. मिलिंद भोई, माजी पोलिस अधिकारी भानुप्रताप बर्गे, मिलिंद गायकवाड, अपर्णा साठे आदी उपस्थित होते. या वेळी अमोल देवळेकर यांनी सूत्रसंचालन केले. तर मिलिंद गायकवाड यांनी आभार मानले.
रामेश्वर नाईक म्हणाले, ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष रुग्णांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी काम करत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना, जवळची रुग्णालये, तेथील उपचारांची माहिती एकाच ठिकाणाहून मिळावी, यासाठी लवकरच वॉर रूम उभारण्यात येणार आहे. प्रत्येक गरजू रुग्णाला आरोग्य सुविधेचा लाभ देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.’
मेळघाटासारख्या अतिदुर्गम भागात काम करताना अनेक आव्हाने येतात. मात्र, त्यावर उपाययोजना करून तेथील बालक, माता व अन्य रुग्णांना उपचार देण्यासाठी आम्ही दोघे प्रयत्नरत आहोत. तरुणांनी पुढे येऊन ग्रामीण भागातल्या आरोग्य व्यवस्थेला सक्षम करण्याचे काम करावे. प्रगत आरोग्य सुविधा दुर्गम भागात पोहचविण्यासाठी समाजाच्या व शासनाच्या स्तरावर प्रयत्न व्हावेत. सध्या या भागातील कुपोषणाचे प्रमाण घटले असून, आरोग्य सुविधा उपलब्ध होऊ लागल्या आहेत.डॉ. रवींद्र कोल्हे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते