पुणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सिद्धगडावर मानवंदना

अमृता चौगुले

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून सह्याद्री पर्वतरांगेतील गडकिल्ल्यांमध्ये अतिशय आव्हानात्मक मानला जाणार्‍या भीमाशंकर अभयारण्यातील सिद्धगड बालेकिल्ल्यावर स्वराज्य ट्रेकर्स आणि टीम पॉइंट ब्रेक अ‍ॅडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली. मोहिमेची सुरुवात बोरवाडी (ता. मुरबाड, जि. ठाणे) येथून गिर्यारोहकांनी केली. पहिल्या टप्प्यात शेताच्या बांधावरून जाणार्‍या मार्गानंतर खड्या चढाईस सुरुवात केली. तब्बल दोन तासांची पायपीट केल्यानंतर खड्या चढाईचा मार्ग थेट सिद्धगड माचीवर घेऊन येतो. येथून बालेकिल्ल्याला अर्धवर्तुळाकार वळसा मारल्यानंतर येथेच माचीवर छोटीशी लोकवस्ती असलेले सिद्धगड गाव वसलेले पाहायला मिळत आहे. लोकवस्तीतून पुढे उजव्या बाजूला जाणारा मार्ग बालेकिल्ला शिखरावर घेऊन जातो. हा मार्गदेखील खड्या चढाईचा असून, काही ठिकाणी तर कातळात कोरलेल्या पायर्‍या आहेत.

संबंधित बातम्या :

जवळपास दोन तासांच्या पायपिटीनंतर बालेकिल्लावर गिर्यारोहक पोहचले. सर्व गिर्यारोहकांनी समोरच शिवलिंगावर माथा टेकवून डाव्या बाजूला असणार्‍या बुरुजावर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार करीत त्यांच्या प्रतिमेला वंदन केले.
मानसिक आणि शारीरिक कसोटी पाहणारी तब्बल दहा तासांची पायपीट, खड्या चढाईचा खडतर मार्ग, बाजूलाच असणार्‍या खोल दरी आणि शेजारून जाणारी निसरडी पायवाट अशा सर्व आव्हानांना सामोरे जात हिंदवी स्वराज्याची तिसरी राजधानी असलेल्या जिंजी किल्ल्यावर भटकंतीची शंभरी पूर्ण करण्यासाठी सज्ज असलेले स्वराज्य ट्रेकर्सचे सज्जन ताकतोडे, अरुण देशमुख, भागवत यादव, माणिक पाटील, सागर कुंभार, राहुल व्हावळ, तानाजी राजगुडे, अभिलाष पाटील, रमेश चव्हाण, प्रल्हाद नांगरे, अभिषेक शेळके, रूपेश गमरे आणि डॉ. समीर भिसे यांनी ही मोहीम यशस्वी केली.

SCROLL FOR NEXT