विश्रांतवाडी : येरवडा- कळस- धानोरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक एक, दोन व सहामधील निवडणूक अर्जांची बुधवारी (दि.३१) छाननी करण्यात आली.
छाननीसाठी इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. येथील निवडणूक कार्यालयात एकूण २४८ अर्ज जमा केले होते. त्यातील दोन अर्ज छाननी प्रक्रियेत बाद केले असून उर्वरित २४६ अर्ज स्वीकारले आहेत.
प्रभाग क्रमांक दोन 'ब' मधील गणेश बाबासाहेब भिसे व प्रभाग सहा 'ब' मधील पूजा विलास काटकर यांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत. गणेश बाबासाहेब भिसे यांनी मतदार यादीत नाव असल्याची साक्षांकित प्रत जमा केली नव्हती.
ऑनलाइन तपासणी केली असता भिसे यांचे नाव मतदार यादीत आढळून आले नाही. तसेच, पूजा विलास काटकर (प्र. ६ ब) यांनी नोटेराइझ एफिडेविट जमा केले नव्हते, फॉर्मवर उमेदवाराची सही नव्हती. तसेच, नामनिर्देशन पत्रातील काही रकाने कोरे होते, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांनी दिली.
प्रभाग क्रमांक ६ - अ मधून राजेश वाल्हेकर व सिद्धार्थ संजय भालेराव या दोघांनी शिवसेना ठाकरे गटाकडून अर्ज भरले होते. मात्र, राजेश वाल्हेकर यांच्या एबी फॉर्मवर खाडाखोड होती. निवडणूक अधिकाऱ्यांनी वाल्हेकर यांना फॉर्मवर केलेली खाडाखोड प्रत्यक्ष दाखवून दिली. त्यामुळे त्यांना आता अपक्ष म्हणून लढावे लागणार आहे. तर भालेराव यांचा शिवसेना ठाकरे गटाकडून अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज स्वीकारला गेला आहे, अशीही माहिती बारवकर यांनी दिली.