येरवडा: येरवडा येथील लक्ष्मीनगरमध्ये रोहित्रातून विजेचा शॉक बसून मंगळवारी एका श्वानाचा मृत्यू झाला. या रोहित्राच्या देखभाल दुरुस्तीकडे महावितरणचे दुर्लक्ष झाल्याने श्वानाला जीव गमवावा लागल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
लक्ष्मीनगर येथे बबन भेसके यांच्या घराच्या बाजूला महावितरण कंपनीने रोहित्र बसविले आहे. यातून परिसरातील 100 घरांना वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र, हे रोहित्र धोकादायक असल्याची तक्रार भेसके यांनी अनेकवेळा महावितरणच्या अधिकार्यांकडे केली. (Latest Pune news)
मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे श्वानाला जीव गमवावा लागल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. या रोहित्रातून होणार्या शॉर्ट सर्किटमुळे अनेकदा वीजपुरवठा खंडित होत आहे. याबाबत तक्रार केल्यावर महावितरणचे कर्मचारी येतात आणि तात्पुर्ती दुरुस्ती करून जात असल्याचे रहिवासी जाफर बाजे यांनी सांगितले.
भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनवर पठाण म्हणाले की, आज शॉक बसून श्वानाचा मृत्यू झाला आहे. एखाद्या माणसाचा जीव गेल्यावर महावितरण या रोहित्राकडे लक्ष देणार का? महावितरणने दखल न घेतल्यास आंदोलन केले जाईल. याबाबत महावितरणचे कार्यकारी अभियंता अशोक जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.