Alandi Palkhi Together
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० वे जन्मवर्ष व संत तुकाराम महाराज यांचे ३७५ वे वैकुंठगमन वर्ष अशा दुग्धशर्करा योगाचे औचित्य साधून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीला परतीच्या प्रवासात आळंदीत दशमीला मुक्कामी येण्याचे निमंत्रण आळंदी देवस्थानने दिले होते. हे निमंत्रण जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानने स्वीकारले असल्याचे संस्थानचे अध्यक्ष जालिंदर मोरे यांनी सांगितले. यामुळे यंदा तुकोबांची पालखी आषाढी वारीत परतीच्या प्रवासात रविवारी (दि. २०) आळंदीत दाखल होणार आहे. आळंदीत ज्ञानोबा - तुकोबांची पालखी एकत्र येणार आहे.
माउलींची पालखी दशमीला पुण्याहून निघून आळंदीत सायंकाळी दाखल होत असते. याच दरम्यान दुपारच्या विसाव्याला तुकोबांची पालखी दिघी मॅगझिन चौकातून माउलींच्या पालखीसोबत सहभागी होणार आहे. त्यानंतर दोन्ही पालख्यांचे माउलींच्या थोरल्या पादुका मंदिरात स्वागत करण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी सांगितले. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरापासून दोन्ही पालख्या आळंदीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. आळंदीत दोन्ही पालख्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. तुकोबांचा पालखी सोहळा आळंदीत मुक्कामी राहणार असून, एकादशीला मोशीमार्गे देहूला जाणार आहे.
सन १६८५ साली संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराजांनी आषाढी वारी पालखी सोहळा सुरू केला. त्या वेळी जाताना व येताना श्री क्षेत्र आळंदीमार्गेच संत तुकाराम महाराज पालखीचा प्रवास होत होता. त्या आठवणींना या निमित्ताने उजाळा मिळणार असल्याचेदेखील मोरे यांनी सांगितले.
सन २००८ साली परतीच्या प्रवासात संत तुकाराम महाराजांची पालखी दशमीला आळंदीत मुक्कामी बोलविण्यात आली होती. या वेळी आळंदी देवस्थानने त्यांचे स्वागत केले होते. त्यानंतर सतरा वर्षांनी पुन्हा तुकोबांची पालखी आळंदीत येत आहे.
भोसरी, मोशी पंचक्रोशीतील गावांना तुकोबांच्या पालखीचा गावातून प्रवास होऊन सहवास व सेवा लाभत नाही. यंदा आळंदीत तुकोबांची पालखी येत आहे. पालखी भोसरीमार्गे येणार आहे. आळंदीतून माउलींचा निरोप घेतल्यानंतर तुकोबांची पालखी मोशी, टाळगाव चिखलीमार्गे देहूत दाखल होणार आहे. यामुळे या गावांना पालखीचे स्वागत करण्याचे भाग्य लाभणार