Dnyaneshwar Maharaj Palkhi in Daundaj
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम उरकून बुधवारी (दि. २५) हा पालखी सोहळा वाल्मीक ऋषींची तपोभूमी असणाऱ्या वाल्हेकडे पहाटे सहा वाजता मार्गस्थ झाला. सकाळी दौंडज खिंडीत माउलींचा सोहळा विसावला. शेतकरी बांधवांनी आणलेल्या भाजी-भाकरीची न्याहारी वारकऱ्यांनी केली. या वेळी दौंडज खिंड वारकऱ्यांनी फुलून गेली होती.
मंगळवारी (दि. २४) माउलींचा पालखी सोहळा खंडोबा देवाच्या सुवर्णनगरीत मुक्कामी होता. पहाटे पूजा, अभिषेक होऊन हा सोहळा वाल्हेकडे मार्गस्थ झाला. सकाळी साडेसात वाजता दौंडज खिंडीत पालखी सोहळा न्याहारीसाठी विसावला. दौंडज व परिसरातील वाड्या, कोळविहिरे, भोरवाडी परिसरातील शेतकरी वारकऱ्यांसाठी भाजी-भाकरी, मिरचीचा ठेचा, वेगवेगळ्या भाज्या, पिठले आदी घेऊन आले. भाजी-भाकरीची न्याहारी करून वारकऱ्यांनी समाधानाची ढेकर दिला. न्याहरीनंतर पालखी सोहळा वाल्हेकडे रवाना झाला.
दौंडज खिंडीत माउलींच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे म्हणाले, यावर्षी सगळीकडे पाऊस चांगला होऊन पेरण्यादेखील झाल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीला ७५० वर्षे पूर्ण झाल्याने या पर्व काळानिमित्त वारकरी बांधवांची संख्या या सोहळ्यात मोठी आहे. दिवे घाटापासून पुढे रस्ते चांगले आहेत. श्रावण महिन्यासारखे वातावरण आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह आहे.