आढळराव पाटलांना खासदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; ज्ञानेश्वर कटके यांचा निर्धार  Pudhari
पुणे

Political News: आढळराव पाटलांना खासदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; ज्ञानेश्वर कटके यांचा निर्धार

पुणे म्हाडाचे अध्यक्ष आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे व्यक्तिमत्व वेगळेच आहे.

पुढारी वृत्तसेवा

मंचर: पुणे म्हाडाचे अध्यक्ष आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे व्यक्तिमत्व वेगळेच आहे. पद असो किंवा नसो, समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे आढळराव कधी थकलेले दिसले नाहीत.

त्यांची विकासकामे करण्याची धमक आणि संपर्क हा आम्हा आमदारांसाठी ऊर्जा स्त्रोत आहे. त्यांना पुन्हा खासदार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी व्यक्त केला.

म्हाडाचे अध्यक्ष, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे महाराष्ट्राचा हास्य मेळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आढळराव पाटील यांचा विशेष सन्मान करून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी आमदार कटके बोलत होते. (Latest Pune News)

माजी आमदार अतुल बेनके म्हणाले, आढळराव पाटील यांच्या रूपाने अपराजित योद्धा आपल्याला लाभला आहे. परिस्थितीमुळे आढळराव पराभूत झाले, त्याला आम्हीही कारणीभूत आहोत. शिरूर लोकसभेला जबाबदार नेतृत्व हवे आहे. दादा कर्तव्यशील, कार्यशील असल्याने कुठल्याही परिस्थितीत त्यांना खासदार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.

सत्कारला उत्तर देताना आढळराव पाटील म्हणाले, राजकारण हे माझे अंग नाही अथवा छंद नाही. मी अपघाताने राजकारणात आलो. मला राजकारणाची चटक नाही; मात्र सर्वसामान्य जनतेचे काम करताना समाधान वाटते. जनतेचे अश्रू पुसण्यात मला आनंद मिळतो. 25 वर्षांच्या राजकारणात मी कधी राजकारण केले नाही.

राजकारण हे समाजकारण करण्याचे क्षेत्र आहे. ज्यांनी मला लोकसभेला निवडून दिले, त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा मी प्रयत्न करतो आहे. माझ्यासाठी सत्ता, पद महत्त्वाचे नसून जनता महत्त्वाची आहे. वाढदिवसाला मिळालेल्या शुभेच्छामुळे काम करण्याची स्फूर्ती वाढल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णू काका हिंगे यांनी स्वागत केले. नीलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले. गायक चेतन लोखंडे यांनी आढळराव पाटील यांच्यावर सादर केलेले गाणे वाहवा मिळवून गेले.

विनोदी कार्यक्रमाने सर्व बुडाले हास्यकल्लोळात

श्री भैरवनाथ पतसंस्था, श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ, शिवाजीराव आढळराव पाटील प्रतिष्ठान, डायलॉग इंडिया यांच्या वतीने जल्लोष मराठमोळा महाराष्ट्राचा हास्य मेळा हा कार्यक्रम लांडेवाडी येथे पार पडला. चेतन लोखंडे व रोहित राऊत यांनी सादर केलेली गाणी सर्वांना मंत्रमुग्ध करून गेली.

मानसी नाईक यांनी सादर केलेल्या लावण्या तसेच हास्य अभिनेते भाऊ कदम, भारत गणेशपुरे, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप यांच्या विनोदी कार्यक्रमाने उपस्थित सर्व हास्यकल्लोळात बुडाले. सभागृहात उपस्थित सर्वांनी मोबाईलचे टॉर्च चालू करून हात हलवत आढळराव पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT