पुणे

पश्चिम घाटातील 30 हजार जीव-जंतूंच्या डीएनएचे जतन

Laxman Dhenge

पुणे : भारत सरकारच्या पर्यावरण,वन आणि हवामान बदल मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय प्राणी सर्वेक्षण पश्चिमी प्रादेशिक केंद्राने पश्चिम घाटात आढळून आलेल्या सुमारे 30 हजारहून अधिक जीवजंतूंच्या प्रजातींचे दस्तऐवजीकरण केले आहे.
पश्चिम घाटातील जीवजंतूं संदर्भात झेड.एस.आय.(झुलॉजिकल सर्व्ह ऑफ इंडिया) मार्फत संशोधनकार्य सुरू असून त्या सर्वांचा डीएनए अहवाल तयार करण्याचे कामही वेगाने सुरू आहे.

पश्चिम प्रादेशिक केंद्र,पुणे येथे उभारण्यात येणार्‍या पश्चिम घाट प्राणीसंपदा संग्रहालयाला भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने तत्त्वत: मान्यता दिली असून लवकरच त्यासाठी स्वतंत्र अशी नवीन इमारत बांधली जाणार आहे. तसेच संस्थेच्या माध्यमातून पुण्यात वन्यजीव न्यायवैद्यक प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी भारत सरकारकडे प्रस्ताव देण्यात आला आहे.अशी माहिती केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. बासुदेव त्रिपाठी यांनी दिली.

375 प्राण्यांच्या प्रजातींचे नमुने…

भारतीय प्राणी सर्वेक्षण पश्चिमी प्रादेशिक केंद्र हे पुण्यातील आकुर्डी परिसरात असून येथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी जैवविविधता आणि त्यांच्या संवर्धनाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी विविध प्राण्यांच्या सुमारे 375 प्रजातींचे 750 हून अधिक नमुने असलेले एक संग्रहालयदेखील आहे.

रात्रीच्या वेळी फिरणार्‍या कीटकांच्या नोंदी…

संस्थेच्या शास्त्रज्ञांनी पुस्तके, पुस्तक प्रकरणे, संशोधन लेख आणि लोकप्रिय लेखांच्या स्वरूपात असंख्य प्रकाशनांमध्ये योगदान दिले आहे. यामध्ये रात्रीचे प्राणी (विंचू आणि कोळी), राज्यातील प्राणी (महाराष्ट्र आणि गोवा), संरक्षित क्षेत्रातील प्राणी (मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,) यांचा समावेश आहे. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य, चंदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना वन्यजीव अभयारण्य, लोणार वन्यजीव अभयारण्य, फणसाड वन्यजीव अभयारण्य आणि राधानगरी वन्यजीव अभयारण्य), पाणथळ परिसंस्थेचे प्राणी (नाथसागर आणि उजनी) या प्रमुख कामांचा समावेश आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT