Private Bus Fare Action Pudhari
पुणे

Private Bus Fare: दिवाळीत खासगी बसने जादा भाडे आकारल्यास सावधान! आरटीओचा कारवाईचा इशारा; तक्रारीसाठी व्हॉट्सॲप क्रमांक जारी

शासनाने निश्चित केलेल्या भाड्यापेक्षा अधिक आकारणी केल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई; तिकीट आणि नावासह तक्रार नोंदवण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दिवाळीच्या कालावधीत खासगी प्रवासी बसमालकांनी शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक भाडे आकारू नये. निर्धारित भाड्यापेक्षा अधिक आकारणी करणाऱ्या बसमालकांविरुद्ध मोटार वाहन कायदा १९८८ व संबंधित नियमांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिला आहे.

दिवाळीच्या काळात प्रवासीसंख्या वाढत असल्याने काही खासगी बसमालकांकडून मनमानी पद्धतीने अधिक भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी येतात. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथे बसमालक संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेण्यात आली.

या बैठकीत प्रवाशांची आर्थिक पिळवणूक रोखणे आणि रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांच्यासह बसमालक संघटनेचे एकूण २६ प्रतिनिधी उपस्थित होते.

शासनाने २० एप्रिल २०१८ रोजीच्या निर्णयानुसार खासगी बसमालकांना निर्धारित केलेल्या भाड्याच्या मर्यादेतच प्रवासीभाडे आकारणे बंधनकारक आहे. या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर दिवाळीच्या कालावधीत विशेष लक्ष ठेवून कारवाई करण्यात येणार आहे.

तक्रारी नोंदविण्याचे आवाहन

प्रवाशांनी अधिक भाडे आकारणी किंवा इतर नियमभंग आढळल्यास व्हॉट्सॲप क्रमांक ८२७५३३०२०९ यावर संबंधित तक्रार नोंदवावी. आपले नाव, भ्रमणध्वनी क्रमांक आणि तिकिटाचा छायाचित्रासह वरील व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT