पुणे : यंदाची आमची दिवाळी कर्तव्य बजावताना साजरी होत आहे. तसेही दरवर्षी सण-उत्सवाला आम्ही घरी नसतो. कारण, तेव्हाही आम्ही कर्तव्य बजावतो. कर्तव्य बजावणे, हेही देशाप्रती आपले योगदान देणे आहे. चोवीस तास ऑनड्युटी असताना कुटुंबाला वेळ देता येत नाही. पण, आम्ही कामातच खरा आनंद मानतो, या भावना आहेत 24 तास ऑनड्युटी असणाऱ्या पोलिसांच्या, अग्निशमन दलातील जवानांच्या, डॉक्टरांच्या, परिचारिकांच्या.(Latest Pune News)
दिवाळी म्हटली की सुटी अन् कुटुंबासोबत दिवाळीचा आनंद घेणे, असे समीकरण येते. पण, 24 तास ऑनड्युटी असणाऱ्यांची दिवाळी कुटुंबासोबत क्वचितच साजरी होते. कारण, दिवाळीच्या दिवसांमध्येही ते आपले कर्तव्य बजावत असतात. कुटुंबाबरोबर सण-उत्सव साजरे करण्याची उणीव त्यांना जाणवते; पण त्यांच्यासाठी कर्तव्य बजावतानाचा आनंद महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता कुटुंबही त्यांना पाठिंबा देऊ लागले आहे. यंदाही डॉक्टर, परिचारिका, पोलिस, अग्निशमन दलातील जवान, औषध विक्रेते, स्वच्छता कर्मचारी, वकील, व्यावसायिक आदी लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही कर्तव्य बजावणार आहेत.
सायंकाळी व्हिडीओ कॉलद्वारे कुटुंबीयांशी संवाद साधत ते हा दिवस साजरा करणार आहेत. तसेच, काम झाल्यानंतर रात्री उशिरा घरी गेल्यानंतर ते लक्ष्मीपूजनाचा दिवस साजरा करण्याचा आनंद घेणार आहेत. सणाच्या दिवशीही ऑनड्युटी असणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, नपोलिस, अग्निशमन दलातील जवान, औषध विक्रेते, स्वच्छता कर्मचारी, व्यावसायिक, वकील आदींशी दै. ’पुढारी’ने संवाद साधला.
सणासुदीच्या काळात फुलांशिवाय कोणताही उत्सव अपूर्णच वाटतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवसभर बाजारात फुलांचे व्यवहार होत असल्याने त्याला पर्यायी दिवस असलेल्या षष्ठी दिवशी शहरातील बहुतांश फूल विक्रेत्यांकडून लक्ष्मीपूजन केले जाते. ही परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे. घबाडषष्ठीच्या दिवशी परंपरागत पद्धतीने साहित्यांची पूजा करीत कामगारांना बोनस आणि मिठाईचे वाटप केले. आमचे लक्ष्मीपूजन हे घबाडषष्ठी दिवशीच पार पडते. -सागर भोसले, फूल अडतदार, मार्केट यार्ड
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. घरात लक्ष्मीपूजन सुरू असताना आम्ही रुग्णालयात आमच्या रुग्णांच्या सेवेत व्यग््रा असतो. दिवाळीचा उत्सव कुटुंबीयांसोबत साजरा करता आला नाही, तरी एखाद्या रुग्णाच्या चेहऱ्यावर हसू आणता आले, तर तीच आमच्यासाठी खरी दिवाळी ठरते.डॉ. अमेय अरुण वीर
दिवाळीच्या दिवसांमध्ये आम्ही ’ऑनड्युटी’ असतो. कारण, ते आमचे कर्तव्य आहे आणि हे खूप महत्त्वाचे आहे. त्यापेक्षा मोठे काहीच नाही. आम्ही ऑनड्युटी असल्यामुळेच लोक आनंदात दिवाळी साजरा करतात. आम्हाला अभिमान वाटतो की, आम्ही सदैव आपले कर्तव्य बजावत असतो. लोकांच्या आनंदातच आमचा आनंद आहे. दिवाळीचे पाच दिवस आमच्यासाठी महत्त्वाचे असतात. एखादी आगीची घटना घडली तर आम्हाला तेथे तातडीने जावे लागते, आमच्यासाठी कर्तव्य खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे कर्तव्य बजावण्यातच आम्ही खरा आनंद मानतो. -प्रमोद सोनावणे, स्टेशन ड्युटी ऑफिसर, हडपसर अग्निशमन केंद्र
दिवाळीची सुटी असली तरी अटक केलेल्या व्यक्तींच्या पोलिस कोठडीबाबतचे न्यायालयीन कामकाज थांबत नाही. त्यामुळे पक्षकाराच्या बाजूने हजर राहायचे झाल्यास आम्हाला न्यायालयात यावे लागते. न्यायासाठी लढणे हे आमचे कर्तव्य आहे. न्यायालयात उपस्थित राहणे म्हणजे आमच्यासाठी एकप्रकारे सेवाच आहे. इतर लोक उत्सव साजरा करीत असताना आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असतो. हीच आमच्यासाठी खरी दिवाळी ठरते.ॲड. राकेश सोनार, फौजदारी वकील