पुणे : पुढारी वृत्तसेवा
वादग्रस्त आएसएस अधिकारी पूजा खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमीलयर सर्टिफिकेट सादर केले होते. आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचे त्यांनी सांगितले होते. (Pooja Khedkar Case )
मात्र नुकतीच पूजा यांच्या वडील दिलीप खेडकर यांनी लढविलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःची माहिती देताना मनोरमा या पत्नी असल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे खेडकर दाम्पत्याच्या घटस्फोट अन् त्यासंबंधी प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्यांचा झालेला घटस्फोट नावापुरताच तर नव्हता ना, असाही सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
नुकताच मनोरमा, दिलीप खेडकर या दाम्पत्याचा खरंच घटस्फोट झाला होता का, याचा तपास करण्याचे आदेश केंद्र सरकारने पुणे पोलिसांना दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, २०१० साली खेडकर दाम्पत्याचा संमतीने घटस्फोट झाला आहे. मात्र, घटस्फोट नावापुरताच तर नव्हता ना? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी घटस्फोटाचा बनाव रचला का? याचा शोध आता केंद्र सरकारकडूनदेखील सुरू झाला आहे. दिलीप आणि मनोरमा खेडकर यांनी २००९ मध्ये पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. त्यांचा २०१० मध्ये घटस्फोट मंजूर झाला.
एवढंच नाही, तर मनोरमा खेडकर यांनी पोटगी आणि मालमत्तेत हिस्सादेखील मागितला नसल्याचे निकालावरून दिसून येते. दोन मुलांचा ताबा मनोरमा खेडकर यांच्याकडेच होता. मात्र, झालेला घटस्फोट फक्त कागदोपत्री होता का? कारण दोघे पती-पत्नी म्हणून पुण्यातील बाणेर भागातील नॅशनल को-ऑपरेटीव्ह सोसायटीतील ओम दीप नावाच्या बंगल्यात नवरा-बायको म्हणून राहत असल्याची माहितीही आता समोर आली आहे.
हा बंगला मनोरमा खेडकर यांच्या नावे असून, दिलीप खेडकर हेदेखील पती या नात्याने सोसायटीचे सदस्य आहेत. त्याबरोबरच दीड वर्षापूर्वी दिलीप खेडकर यांनी सोसायटीच्या कॉमन जीममधील ट्रेनरला कानाखाली लगावली होती. त्याची तक्रार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात नोंद आहे.
दिलीप खेडकर यांनी सोसायटीच्या वॉचमनलादेखील मारहाण केली होती आणि सोसायटीने त्यासाठी त्यांना जाब विचारला होता. तर निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिलीप खेडकर यांनी मनोरमा खेडकर यांचा पत्नी म्हणून उल्लेख केला होता.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना पिंपरी - संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयाकडून (वायसीएम) दिलेले ७ टक्के दिव्यांगाचे प्रमाणपत्र हे बनावट नाही. याबाबत संबंधित डॉक्टरांकडून अहवाल मागविला होता. त्यामध्ये कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे आढळले.
तथापि, त्यांना दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना शिक्षण किंवा नोकरीसाठी कोणतीही सुविधा मिळू शकणार नाही, असे वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी बुधवारी (दि. २४) स्पष्ट केले. पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राचा मुद्दा सध्या चर्चेत आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने वायसीएम रुग्णालय प्रशासनाला याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यास अनुसरुन वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. वाबळे यांनी संबंधित फिजियोथेरपी आणि अस्थिरोग विभागाकडून याबाबत खुलासा मागविला होता.
हा खुलासा प्राप्त झाल्यानंतर यामध्ये कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे आढळले आहे, असे डॉ. वाबळे यांनी स्पष्ट केले. डॉ. वाबळे म्हणाले, की पूजा खेडकर यांना दिलेले दिव्यांग प्रमाणपत्र हे ७ टक्क्यांचे आहे. त्याच्या आधारावर नोकरी किंवा शिक्षणासाठी सुविधा मिळू शकत नाही. याबाबतचा अहवाल आयुक्तांना सादर केला आहे.