पुणे: पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक उरला आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित करणारी धक्कादायक घटना दिवे घाटातील प्रकारामुळे समोर आली आहे. तब्बल 100 ते 150 बुलेटस्वार तरुणांनी घाट परिसरात अक्षरशः धुमाकूळ घालत कोयते आणि तलवारी हवेत नाचवल्या.
हा सर्व प्रकार सुरू असताना पोलिस यंत्रणा कुठे होती? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. याबाबत राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
दिवे घाट परिसरात रविवारी रात्री मोठ्या संख्येने बुलेटस्वार तरुण जमा झाले होते. अनेक दुचाकींच्या सायलेन्सरमधून कानठळ्या बसवणारे आवाज काढत त्यांनी घाट परिसर दणाणून सोडला. त्यानंतर काही तरुणांनी हातात कोयते आणि तलवारी घेत भररस्त्यात हवेत फिरवत गाण्यांच्या तालावर डान्स सुरू केला.
या प्रकारामुळे घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली. या टोळक्याचा संपूर्ण नंगानाच एका वाहनधारकाने मोबाईलमध्ये चित्रीत केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली.
‘पुण्यात नेमकं चाललंय काय?’असा प्रश्न नागरिकांनी समाज माध्यमांवर विचारत पोलिस प्रशासनावर जोरदार टीका केली. व्हिडीओच्या आधारे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, संबंधित दुचाकीस्वारांचा माग काढण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.
रात्री उशिरापर्यंत आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे ऑपरेशन सुरू होते. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने तरुण घाट परिसरात जमून खुलेआम शस्त्रांचा धाक दाखवत असताना पोलिसांना त्याची खबरही कशी लागली नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
सर्वसामान्यांनी सुरक्षिततेसाठी कोणाकडे पाहायचे..?
या घटनेचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. ‘सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेसाठी कोणाकडे पाहायचे?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकारानंतर फुरसुंगी पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.