Milk Production Pudhari
पुणे

Milk Production: जिल्ह्यात दूध संकलनात अचानक दोन लाख लिटरची घट; भेसळविरोधी कारवायांच्या धसक्याचा परिणाम

भेसळयुक्त दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवहारावर नियंत्रण येत असल्याने काही प्रमाणात दूध संकलनाची आकडेवारी कमी दिसत आहे का? याचा शोध घेण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

विनोद गायकवाड

पांढरेवाडी: जिल्ह्यात मागील महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये दररोज सुमारे २ लाख लिटर दूध संकलनात घट झाल्याची माहिती मिळत आहे. दूध उत्पादनात एवढी मोठी घट नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याबाबत आता विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे.

भेसळयुक्त दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवहारावर नियंत्रण येत असल्याने काही प्रमाणात दूध संकलनाची आकडेवारी कमी दिसत आहे का? याचा शोध घेण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सामान्यतः पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता, हवामानातील बदल, जनावरांचे आरोग्य आणि बाजारभाव या घटकांचा दूध उत्पादनावर परिणाम होत असतो. मात्र, एका महिन्यात तब्बल २ लाख लिटर प्रतिदिन इतकी घट होणे ही बाब चिंताजनक मानली जात आहे.

दरम्यान, राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. पुणे जिल्ह्यातही अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू असून, अलीकडेच काही व्यावसायिक आस्थापनांवर एफडीए ने धडक कारवाई केली आहे.

दूध संकलनातील घट ही केवळ हंगामी कारणांमुळे आहे की, भेसळविरोधी कारवाईचा अप्रत्यक्ष परिणाम आहे, याबाबत संबंधित विभागांनी सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील दूध संकलन केंद्रे, खासगी-सहकारी डेअऱ्या आणि दूध वाहतूक साखळी यांची तपासणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी आता जोर धरत आहे.

दूध संकलनातील घट आणि भेसळीच्या शंकांमुळे ग्राहकांचा विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी सतीश डोईफोडे यांनी मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात पुणे जिल्ह्यात जवळपास प्रतिदिन २ लाख लिटर दूध संकलनात घट झाली असल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.

या दुधामागचं काळ सत्य...

पांढऱ्या सोन्यात मिळतोय विषाचा थेंब?

शुद्ध दुधाचा शोध: भेसळखोरांवर करडी नजर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT