

पुणे: पुणे शहर पोलिसांनी झोन-७ अंतर्गत अवैध धंदे, संघटित गुन्हेगारीविरोधात 'मिशन क्रॅकडाऊन' ही विशेष मोहीम सुरू केली असून, पहिल्याच दिवशी लोहगाव परिसरात सलग कारवाया करून अवैध दारूविक्री आणि मटका व्यवसायावर धडक कारवाई करण्यात आली.
या कारवाईत सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, दारूचा साठा, रोख रक्कम, मटका साहित्य आणि मोबाईल जप्त केले आहेत.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली झोन-७ मध्ये ही मोहीम सुरू केली आहे. अवैध दारूविक्री, मटका, जुगार, अमली पदार्थ, अवैध शस्त्रे, खंडणी आणि संघटित गुन्हेगारीविरोधात सातत्याने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मोहिमेअंतर्गत दि. १५ जुलै रोजी हॉटेल ब्ल्यू डायमंड, मोझे आळी, लोहगाव येथे दुपारी साडेबारा वाजता छापा टाकण्यात आला. यावेळी चालक हनुमंता शिवलिंगप्पा शिंदे (वय २२) याच्याकडून ७ हजार ९९० रुपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा आणि दोन हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
या प्रकरणात हॉटेलचे मूळ मालक सूरज गायकवाड यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर लोहगाव येथील हॉटेल राजरत्न छापा टाकून चालक संकेत भारत घोडके (वय २८) याच्याकडून ४ हजार ५ रुपयांचा मद्यसाठा आणि ११ हजार ५३० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणात हॉटेलचे मूळ मालक सुहास प्रवीण मोडक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.
लोहगाव परिसरातील यशस्वी हॉटेलच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मटकाअड्ड्यावर छापा टाकण्यात आला. यामध्ये भाऊसाहेब गोपीनाथ रागपसरे याच्यासह तीन मटका रायटर रंगेहाथ पकडण्यात आले.
त्यांच्याकडून १० हजार ८९० रुपयांची रोख रक्कम, कल्याण व मुंबई बाजारचे मटका साहित्य, आठ वापरलेली पावती पुस्तके, अकरा कोरी पावती पुस्तके आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ कराड, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड तसेच त्यांचे पथक यांनी केली.