पुणे : राज्यातील रखडलेल्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण करा. ज्यांनी बदली प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिले आहे, अशा शिक्षकांच्या प्रकरणांमध्ये प्रचलित शासन निर्णयातील तरतुदी व याचिकाकर्त्या शिक्षकांच्या बदलीबाबतची वस्तुस्थिती प्रतिज्ञापत्राद्वारे तत्काळ न्यायालयाच्या निदर्शनास आणून न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्याबाबत कार्यवाही करावी, जेणेकरून आगामी बदली प्रक्रियेवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश राज्याच्या उपसचिव नीला रानडे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांंना दिले आहेत.
रानडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबतचे धोरण 18 जून 2024 च्या शासन निर्णयान्वये सुधारित करण्यात आले आहे. या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
वेळापत्रकानुसार मे. विन्सीस आयटी प्रा. लि., पुणे यांच्याकडून सन 2025 ची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ऑनलाइन पोर्टलद्वाारे पार पडली आहे. बदली प्रक्रियेदरम्यान विविध जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी उच्च न्यायालय, मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे याचिका दाखल केल्या आहेत. संबंधित दाखल याचिकांपैकी काही याचिकांमध्ये उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीस विविध टप्प्यांवर पुढील आदेशापर्यंत अंतरिम स्थगिती दिली होती.
त्यामुळे सन 2025 च्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने दाखल झालेल्या ज्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये याचिकाकर्त्यां शिक्षकांच्या बदलीस अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे, अशा प्रकरणांमध्ये प्रचलित शासन निर्णयातील तरतुदी व याचिकाकर्त्या शिक्षकांच्या बदलीबाबतची वस्तुस्थिती प्रतिज्ञापत्राद्वारे तत्काळ न्यायालयाच्या निदर्शनास आणून न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्याबाबत कार्यवाही करावी. जेणेकरून सन 2025 च्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेदरम्यान देण्यात आलेल्या बदली आदेशाची पूर्णत: अंमलबजावणी होईल. अन्यथा अशा शिक्षकांच्या बदली आदेशास मिळालेली स्थगिती कायम राहिल्यास त्याचा परिणाम आगामी बदली प्रक्रियेवर होईल, असे देखील रानडे यांनी स्पष्ट केले आहे.