भोर : पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्यात रब्बी हंगामाच्या सुरुवातीपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे ज्वारी पिकांवर काहीन रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरीवर्ग धास्तावला आहे. तालुक्यात मागील आठ दिवसांपासून हवामानात बदल होत असून, ढगाळ हवामान तयार झाले आहे. सायंकाळच्या वेळी पूर्णत: आभाळ ढगांनी भरून येत आहे. अवकाळी पाऊस बरसण्याच्या भीतीने तालुक्यातील बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.
तालुक्यात यंदा रब्बीची ज्वारी, गहू, हरभरा, करडई पिके जोमात आली आहेत. बहुतांश शेतकर्यांची पिके कापणीस तर अनेकांची पिके कापणीविना वाया चालली आहेत. अवकाळी पाऊस बरसला, तर काढणीला आलेली पिके तसेच आंब्याचा मोहर गळून जाणार असल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान होण्याची चिन्हे आहेत.
भोरमध्ये खरिपातील भाताचे उत्पन्न घेतले जाते. पावसाने साथ दिली तर भाताचे उत्पन्न जेमतेम मिळते. भाताच्या विक्रीतून वर्षभराचे आर्थिक चक्र फिरत असते. उत्पन्नाची बाजू कोलमडली तर बळीराजाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते.
– उत्तम खोपडे, बाजारवाडी
सध्या आंब्यांना मोहर बहरला आहे. मात्र, वातावरणातील बदलामुळे मोहर गळू लागला, तर आंब्यावर चिकाटा पडल्याचे चित्र आहे. यामुळे यंदा आंबा उत्पादकांची आर्थिक घडी विस्कटणार आहे.
– आनंदा खोपडे, आंबा बागायतदार, बाजारवाडी
हेही वाचा