पुणे

महायुतीच्या जागा वाटपाबाबत लवकरच चर्चा : सुनील तटकरे

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील लोकसभेच्या महायुतीच्या जागा वाटपाबाबत प्रदेशातील नेत्यांची बैठक येत्या तीन-चार दिवसांत होईल. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत होणार्‍या बैठकीत त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यासंदर्भात विचारणा केली असता तटकरे म्हणाले की, सुनेत्रा पवार यांना बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याबाबत कार्यकर्त्यांची मागणी आहे.

जागावाटप अद्याप झालेले नाही. आम्ही बारामतीची जागा मागितली आहे. ती मान्य झाल्यास आम्ही उमेदवार ठरवू. महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व पक्षांचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहतील. तटकरे म्हणाले की, निवडणूक आयोगाने आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मान्यता दिली. त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. आमच्या पक्षात विविध पक्षांतून नेते व कार्यकर्ते येत आहेत. त्यात मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश नाही. तटकरे यांनी पुण्यात बुधवारी पक्षाच्या पदाधिकार्‍यांचा मेळावा घेतला. पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर आणि अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT