संतोष वळसे पाटील
मंचर : जिल्ह्यात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत दिव्यांग शिक्षकांची तपासणी करणे आवश्यक असताना खर्या दिव्यांगांना जे. जे. हॉस्पिटल मुंबईला पाठवून नाहक त्रास देण्याचा प्रकार पुणे जिल्हा परिषदेकडून घडत आहे. शासन परिपत्रकात दिलेल्या सूचनांनुसार तालुकास्तरीय त्रिस्तरीय समिती यांनी कार्यवाही केली असती, तर खर्या दिव्यांगांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले नसते.
तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी आणि गटशिक्षण अधिकारी यांच्या त्रिस्तरीय सदस्य समितीने कोणतीही तपासणी न केल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील खर्या दिव्यांगांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. दिव्यांगांना जे. जे. हॉस्पिटल, मुंबईला तपासणीसाठी पाठविणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. जिल्हा पातळीवर तपासणी करणे आवश्यक असताना दिव्यांगांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे. खोटे दिव्यांग कोण, हे न शोधता खर्या दिव्यांगांना नाहक त्रास सुरू झाल्याने तीव— संताप व्यक्त केला जात आहे. खोटे दिव्यांगांचा शोध घेता न येणे, हे जिल्हा प्रशासनाचे अपयश आहे. आपली यंत्रणा या ठिकाणी अपयशी ठरली आहे का? जिल्हा शल्यचिकित्सक उपलब्ध असताना मुंबईला कशाला पाठवायचे? पहिले पुण्यातच तपासणी करा. एका ठिकाणी सर्व दिव्यांग कर्मचारी यांना तपासावयाचे असल्यास फक्त त्या संवर्गातील तीन ते चार डॉक्टरांची आवश्यकता आहे. चार ते पाच दिवसांत सर्व शंभर टक्के शिक्षक कर्मचारी तपासता आले असते, असे शिक्षकांचे मत आहे.
शिबिर आयोजित न करता ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांनी त्यांची अकार्यक्षमता दाखवून दिल्याचे समजते. ज्याप्रमाणे ससून येथे गर्दी असते, त्यापेक्षा पाच पट अधिक गर्दी जे. जे. रुग्णालय मुंबई येथे असते. मात्र, तरीदेखील त्यांनी अशी तपासणी करण्याला होकार दिला आहे. दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेल्या शिक्षक कर्मचार्यांची फेरतपासणी जे. जे. रुग्णालयात करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी काढल्याने त्यानुसार पुढील कार्यवाही लवकरच केली जाईल. परिणामी, खर्या दिव्यांग शिक्षकांमध्ये नाराजीची भावना तयार झाली आहे.
मुंबई येथे जाणे-येणे आणि तेथील गर्दी पाहिली तर दिव्यांग शिक्षकांचे मोठे हाल होणार आहेत. याबाबत जिल्हा परिषदेने पुण्यामध्येच किंवा तालुकास्तरावर दिव्यांग शिक्षकांची वैद्यकीय तपासणी केल्यास कोणाची हरकत नाही. मुंबई येथे जर दिव्यांग शिक्षकांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवणार असाल, तर दिव्यांग शिक्षकांच्या पाठीशी दिव्याग संघटना उभ्या राहतील आणि पुणे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करतील.समीर टाव्हरे, ज्ञानेश्वर शिंदे, अध्यक्ष आणि सचिव, दिव्यांग संघटना