मंचर: उत्तर पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पासाठी जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहचला आहे. धरणात रविवारी (दि. ७) केवळ ७.६७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
कडक ऊन, वाढते तापमान आणि पाण्याचा वाढता वापर यामुळे धरणांची पाणीपातळी झपाट्याने घटत आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गतवर्षी याच वेळेस पाऊस सुरू झाल्यामुळे ११.६७ टक्के या प्रमाणे पाणीसाठ्यात वाढ झाली होती.
कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठे धरण असलेल्या डिंभे धरणावर आंबेगाव, जुन्नर, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यांतील मोठा भाग अवलंबून आहे. धरणातील साठा वेगाने कमी होत असल्याने जलव्यवस्थापनाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. डिंभेसह कुकडी प्रकल्पातील इतर धरणांमधील पाणीसाठाही दिवसेंदिवस घटत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असताना शेतकरी वर्गाचे लक्ष मान्सूनकडे लागले आहे. वेळेत आणि समाधानकारक पाऊस झाला नाही तर शेतीबरोबरच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आगामी काही दिवसांत पावसाला सुरुवात न झाल्यास कुकडी प्रकल्प क्षेत्रातील पाणीस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता कुकडी प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी दत्ता कोकणे यांनी व्यक्त केली.
डिंभे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने घट होत असल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे. पेरणीचा कालावधी जवळ येत असताना अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामाचे नियोजन करताना अनेक अडचणी निर्माण होत असून, पाण्याच्या उपलब्धतेबाबत शेतकरी साशंक आहेत.संदीप थोरात, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर
सद्यःस्थितीत उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून धरण व्यवस्थापन काळजीपूर्वक करण्यात येत आहे. मान्सून नियमित होईपर्यंत पाण्याचा वापर जपून करण्याची आवश्यकता आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांनी पाणीबचतीला प्राधान्य दिल्यास उपलब्ध साठा अधिक काळ टिकवून ठेवणे शक्य होईल.गणेश नान्नोर, कार्यकारी अभियंता, कुकडी प्रकल्प