पुणे

नवी सांगवी : मैलामिश्रित पाणी थेट पवना पात्रात; महापालिकेचे दुर्लक्ष

अमृता चौगुले

नवी सांगवी : पिंपळे गुरव येथील पवना नदीपात्रातील चेंबर फुटल्याने त्यातून मैलामिश्रित पाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. त्यामुळे नदीपात्रात घाणीचे साम्रज्य पसरले आहे. दुर्गंधीमुळे रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक हैराण झाले आहेत. एकीकडे नदी स्वच्छता अभियान राबविले जात आहे. तर, दुसरीकडे महापालिका प्रशासन अशा समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.

दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

स्मार्ट सिटीसारख्या पिंपळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवी या भागाला जोडणार्‍या पवना नदीपात्रात मैलामिश्रित पाणी मोठ्या प्रमाणात थेट मिसळत आहे. तरीदेखील संबंधित प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. येथील तुळजाभवानी मंदिर परिसरात अनेक इमारती, सोसायट्या, व्यावसायिक व नागरी वसाहती वसलेल्या आहेत. महापालिकेने मलनिस्सारणाची समस्या सोडवण्यासाठी परिसरात नव्याने पाइपलाइन टाकून मैलामिश्रित सांडपाणी चेंबरची व्यवस्था केली आहे. मात्र, मैलामिश्रित सांडपाणी वाहिनीतून मोठ्या प्रमाणात गळती होऊन थेट नदीपात्रात मिसळत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

परिसरात वाढला डासांचा प्रादुर्भाव

चेंबर फुटून मैलामिश्रित पाणी नदीपात्रात पसरल्यामुळे प्रदूषण व दुर्गंधीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याकडे महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत, अशी तक्रार येथील स्थानिक रहिवासी करीत आहेत. तसेच, नदीपात्रात दूषित पाणी जात असल्याने येथील नदी दूषित होऊन परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. येथील परिसरात महापालिकेकडून नव्याने पंपिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. मात्र, हे पंपिंग स्टेशन अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

पावसाचे पाणी सध्या मोठ्या प्रमाणात नाल्यामधून येत आहे. ड्रेनेजचे पाणी आणि पावसाचे पाणी एकत्रित आल्याने प्रमाणापेक्षा जास्त झालेले पाणी नदीत मिसळत आहे. पावसाळ्यात तेवढी अडचण येत आहे. तरीदेखील संबंधित अधिकार्‍यांना पाहणी करण्याची सूचना दिली आहे.

– संजय कुलकर्णी,
अभियंता पर्यावरण विभाग

येथील रस्त्यावरून ये-जा करणार्‍यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. डासांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने त्वरित याकडे लक्ष केंद्रित करून चेंबरची दुरुस्ती करावी. यापुढे नदीपात्रात मैलामिश्रित पाणी मिसळून नदी प्रदूषित होणार नाही; तसेच रोगराई पसरणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

– शिवाजी निम्हण,
सामाजिक कार्यकर्ते

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT