पारगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागावे. आपापसांतील हेवेदावे सोडून देऊन पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केले.
कारफाटा रांजणी (ता. आंबेगाव) येथील एका मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत वळसे पाटील बोलत होते. या प्रसंगी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात, शिवाजीराव लोंढे, अजय आवटे, रमेश खिलारी, बारकू बेनके, वैभव उंडे, संतोष वाघ, संपतराव हांडे, रामदास वाघ, अरविंद ब्रह्मे, मालनताई भोर, मंदाकिनी हांडे, गोविंद वाघ, भगवान वाघ, अक्षय वाघ, राहुल भोर आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी आ. वळसे पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत रांजणी गावातून आपण जवळपास 919 मतांनी मागे राहिलो. रांजणी गावात आपण वीज उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, बंधारे, अनेक रस्त्यांची कामे मार्गी लावली. परंतु, रांजणी गावाने आपल्याला साथ न देता गावाजवळचा उमेदवार म्हणून समोरच्या उमेदवाराला साथ दिली, याची खंत मनात आहे.
परंतु, झाले गेले विसरून पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकार्यांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागावे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत अशी चूक करू नका. जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचा सदस्य तुमच्या विचारांचा निवडून गेला नाही तर तुमची कामे होणार नाहीत. त्याचा दोष तुम्ही वळसे पाटलांना देऊ नका.
आपले बूथ, वॉर्डांमध्ये कमिट्या तयार करून त्यामध्ये ज्येष्ठ, तरुण, महिला, युवतींचा समावेश करावा. यापुढील काळात रांजणी गावातील वाकोबा बंधार्याच्या दुरुस्तीकामासाठी प्राधान्याने निधी आणून ते काम मार्गी लावणार आहे. रांजणी गावातील शेतकर्यांना याचा फायदा होईल, असे आ. वळसे पाटील म्हणाले.
दरम्यान याप्रसंगी रांजणी गावातील निवृत्ती थोरात व बाबुराव थोरात यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताच त्यांचा आ. वळसे पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रमेश खिलारी, शिवाजीराव लोंढे, राहुल भोर, गोविंद वाघ, प्रियंका वाघ, सुरेश जाधव, संपत वाघ यांनी मनोगत व्यक्त केले.
रांजणीतील आरोग्य केंद्र लवकरच सुरू होणार
रांजणी गावात आरोग्य केंद्र यापूर्वीच उभे राहिले आहे. परंतु, त्यामध्ये कर्मचारी नसल्याने ते सुरू झाले नाही. मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा केली असून, हे आरोग्य केंद्र लवकरच सुरू होईल, असा विश्वास आ. वळसे पाटील यांनी व्यक्त केला.