पुणे: मेट्रोमधून सफर करणारे बाप्पा, कृष्ण आणि मारुतीसोबत अभ्यासात रमलेले, मूषकाबरोबर सेल्फी काढण्यासह निसर्गाच्या सान्निध्यात रमलेले बालगणेश, अशी नानाविध रूपातील बाप्पाची छायाचित्रे अन् व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर एआय तसेच व्हीएफएक्स म्हणजे व्हिजुअल इफेक्टद्वारे साकारलेले बालगणेशाचे मनमोहक रूप पाहून भक्त भारावून जात असून, बाप्पांची विविध रूपे असलेली छायाचित्रे अन् व्हिडीओ गणेशभक्तांकडून मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. या छायाचित्र आणि व्हिडीओंमुळे जणू बाप्पाच आपल्यासमोर प्रकटल्याची अनुभूती भक्तांना होत आहे. (Latest Pune News)
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत, सगळीकडे उत्सवाचा जल्लोष अन् जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. उत्सवाचा जोश अन् जल्लोष सोशल मीडियावरही रंगला असून, नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आणि ‘एआय’च्या साहाय्याने केलेल्या अनेक नवनव्या गोष्टी यंदाच्या उत्सवात पाहायला मिळणार आहेत.
त्यात सर्वाधिक बोलबाला आहे तो एआयच्या माध्यमातून तयार केलेल्या श्रीगणरायाच्या विविध स्वरूपातील छायाचित्रे आणि व्हिडीओजचा. फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्सवर ही छायाचित्रे आणि व्हिडीओ व्हायरल होत असून, त्याला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, त्यावर लाइक्सचा वर्षावही होत आहे. आत्तापर्यंत सर्वांत पहिल्या सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठा गजबजत होत्या. मात्र, मागील काही वर्षांत तंत्रज्ञानात झालेल्या बदलामुळे आत्ता बाजारपेठांपूर्वी मोबाईलच बाप्पाच्या आगमनाच्या वर्दी देऊ लागले आहेत.
कलेची देवता असलेल्या बाप्पाचे गोंडस रूप दाखविण्यासाठी एआय तसेच व्हीएफक्स कलाकारांमध्ये जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ तसेच छायाचित्रांमधून दिसून येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणार्या व्हिडीओंमध्ये बालरूपी गोंडस गणेशाचे प्रमाण सर्वाधिक आहे.
यापूर्वी शेअर होणार्या अॅनिमेशनपेक्षाही ही छायाचित्रे व व्हिडीओ अधिक उठावदार व आकर्षक दिसत आहे. त्यामुळे, यापूर्वीही कधीही न पाहिलेले बाप्पाचे रूप सध्या सोशल मीडियावर गणेशभक्तांना दिसू लागले आहे. त्याअनुषंगाने गणेशभक्तही व्हीएफएक्स आर्टिस्टकडे फोटो तसेच व्हिडीओजसाठी विचारणा करू लागले आहेत. गणेशभक्तांच्या आवडीनुसार व्हिडीओज बनविण्यात येत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
...अन् बाप्पा प्रत्यक्षात चालू लागतात तेव्हा
सिंहासनावर विराजमान झालेले बाप्पाचे मन मोहविणारे छायाचित्र पाहताच अचानक बाप्पा उठून उभे राहतात. त्यानंतर ते आपल्या दिशेने चालू लागताच मन भारावून जाते. सध्या हे व्हिडीओ खूप व्हायरल होऊ लागले आहेत. शहरातील सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्तेही आपल्या बाप्पाचे असे रूप बनवून घेण्यासाठी एआय तसेच व्हीएफएक्स आर्टिस्टकडे धाव घेऊ लागले आहेत. तसेच, मंडळांच्या बाप्पांची कोणकोणती रूपे तयार करता येतील, याची माहिती घेताना दिसत आहेत.
काय असते व्हीएफएक्स..?
वास्तविक जीवनात किंवा थेट-अॅक्शन चित्रीकरणात अस्तित्वात नसलेले जग तयार करण्यासाठी किंवा हाताळलेल्या प्रतिमांचे वर्णन करण्यासाठी व्हीएफएक्स हा शब्द वापरला जातो. विलक्षण आणि वास्तववादी दिसणारे वातावरण तयार करण्यासाठी फेरफार केलेली प्रतिमा वास्तविक फुटेजसह एकत्रित केली जाते. वास्तविक जीवनात चित्रीकरण करणे एकतर खूप धोकादायक असल्यामुळे किंवा प्रत्यक्षात जग अस्तित्वात नाही, असे वातावरण तयार करण्यासाठी व्हीएफएक्सचा वापर केला जातो.