पुणे

निगडी पीसीएमसी वसाहत इमारतींची दुरवस्था

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : निगडी येथे महापालिका सफाई कर्मचार्‍यांसाठी उभारलेल्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. या इमारतींचा रंग उडाला आहे. खिडक्यांच्या काचा तुटल्या आहेत. इमारतीतील जिने मोडकळीस आलेले आहेत. इमारतीत अनेक जणांकडे वीज मीटर नसून आकडे टाकून रहिवाशांना वीज घ्यावी लागत आहे. त्याचप्रमाणे, येथील इमारतींमध्ये पाणी वर चढत नसल्याने नागरिकांना मोटारीने खेचले जाणारे पाणी विकत घ्यावे लागते.

अन्यत्र पुनर्वसन होण्याची गरज

निगडी येथील पीसीएमसी कॉलनीत एकूण 9 इमारती आहेत. त्यामध्ये 576 सदनिका आहेत. येथील इमारतींची पाहणी केली असता रहिवाशांना विविध अडचणींमध्ये जीवन कंठावे लागत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. आहे त्याच जागी पुनर्वसन करावे, अशी रहिवाशांची मागणी आहे. मात्र, हा भाग रेडझोनमध्ये येत असल्याने त्यासाठी अडथळा जाणवतो. त्यावर उपाय म्हणून येथील रहिवाशांचे अन्यत्र पुनर्वसन व्हायला हवे.

खंडित वीजपुरवठा

वीजबिल न भरल्याने अनेक रहिवाशांचे वीजमीटर काढून नेण्यात आले आहेत. पर्यायाने, येथील रहिवाशांनी पथदिव्यांवरून आकडे टाकून वीज घेतली आहे. येथे वारंवार खंडित वीजपुरवठ्याची समस्या जाणवत आहे.

पाण्यासाठी वणवण

इमारतींमध्ये नळ आहेत. मात्र, पाणी वरच्या मजल्यांवर पाणी चढत नसल्याचे चित्र पाहण्यास मिळते. त्यामुळे मोटारीने पाणी चढवावे लागते. काही जणांनी त्यासाठी मोटारी घेतल्या आहेत. तसेच, प्रतिमहिना दोनशे रुपये घेऊन इमारतीतील रहिवाशांना ते मोटारीद्वारे येणारे पाणी पाइपने पुरवितात. ज्यांना हे पाणी घेणे शक्य होत नाही त्यांना वरच्या मजल्यावरुन खाली उतरुन पाणी भरावे लागते. त्यामुळे एका अर्थाने रहिवाशांची पाण्यासाठी वणवण होत आहे.

रंग उडालेल्या भिंती, तुटलेले जिने

येथील इमारतीच्या भिंतींचा रंग उडालेला आहे. इमारतीतील खिडक्यांच्या काचा तुटलेल्या आहेत. त्याचप्रमाणे, जिने मोडकळीस आलेले आहेत. त्यामुळे येथून ये-जा करताना रहिवाशांना खूपच काळजीपूर्वक चढावे-उतरावे लागते.  या जिन्यांमध्ये अडकून पडण्याचीदेखील भीती आहे. त्याचप्रमाणे, इमारतीतील ड्रेनेज लाईनमधून पाणी गळती होते. पावसाळ्यात तर पाणी गळतीने नागरिक हैराण होऊन जातात. इमारतींवर छोटी-छोटी झाडे उगवली आहेत. इमारतींजवळ अस्वच्छता पाहण्यास मिळते.

दिवसातून किमान दोन वेळा वीजपुरवठा खंडित होण्याचा अनुभव आम्हाला येतो. इमारतीतील जिने तुटले आहेत. ड्रेनेज लाइनमधून पाणी गळती होत असते. तसेच, सदनिकांमध्ये नळ आहेत. मात्र, पाणी वर चढत नसल्याने एक तर मोटारीने येणारे पाणी विकत घ्यावे लागते किंवा खाली उतरुन पाणी भरावे लागते.

– वेणू मांढरे, रहिवासी.

इमारतीमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. बर्‍याचदा रात्री वीजपुरवठा खंडित होतो. इमारतीजवळ पाण्याचा व टाकीचा नळ वेगळा आहे. पाणी वर चढत नसल्याने नागरिकांना खाली उतरुन पाणी विकत घ्यावे लागते.

– मीरा दोडके, रहिवासी.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT